Join us
Daily Top 2Weekly Top 5

किंग खानवर पालिका मेहरबान

By admin | Updated: September 13, 2014 01:34 IST

सामान्य मुंबईकरांनी जर काही अनधिकृत बांधकाम केले, तर पालिका त्याच्यावर हातोडा मारते असा मुंबईकरांचा अनुभव आहे.

वांद्रे : सामान्य मुंबईकरांनी जर काही अनधिकृत बांधकाम केले, तर पालिका त्याच्यावर हातोडा मारते असा मुंबईकरांचा अनुभव आहे. बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान मात्र त्याला अपवाद ठरला आहे. शाहरूखने त्याची कार ठेवण्यासाठी रॅम्प बांधला आहे. शिवाय माउंटमेरीकडे जाणारा रस्तादेखील अडवला आहे. त्यामुळे शाहरूख खानवर पालिका मेहरबान का झाली आहे, असा सवाल सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.शाहरूखने आलिशान कार ठेवण्यासाठी वांद्रे पश्चिमेतील बॅण्ड स्टॅण्ड येथील मन्नत बंगल्याबाहेर रॅम्प बांधला. ३०० वर्षांपूर्वीच्या ९ फुटांच्या माउंटमेरीला जाणाऱ्या सिमेंटच्या रस्त्यावर १९९१च्या सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून शाहरूखने खुलेआमपणे कारसाठी रॅम्प बांधला होता. आता माउंटमेरीला जाणारा रस्ता अवघ्या ६ फुटांचा उरला आहे. त्यामुळे पालिका शाहरूख खानवर मेहरबान असल्याचा आरोप माजी नगरसेवक आणि वॉच डॉग फाउंडेशनचे निकोलस अल्मेडा आणि ग्राँडफे पिमेटा यांनी केला आहे. ३ वर्षांपूर्वी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा रस्ता बंद केला होता. मात्र, माउंटमेरीला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर १४ तारखेपासून सुरू होणाऱ्या माउंटमेरीच्या जत्रेसाठी हा रस्ता वांद्रे पोलीस आणि पालिकेने सुरू केला आहे. मात्र, शाहरूखने उभारलेल्या अनधिकृत रॅम्पच्या बांधकामावर कारवाई होणे गरजेचे आहे. पालिकेने कारवाई न केल्यास येत्या १३ तारखेला शाहरूखच्या घराबाहेर जोरदार निदर्शने करून जत्रेला येणाऱ्या लाखो भक्तांच्या सह्यांची मोहीम राबवण्याचा इशारा अल्मेडा यांनी दिला आहे. या बांधकामावर कारवाई करण्यासाठी एच वॉर्डचे सहायक पालिका आयुक्त प्रशांत सकपाळे यांना अलीकडेच गांधीगिरी करून ख्रिस्ती बांधवांनी पुष्पगुच्छ दिला होता, त्यानंतरही प्रशासनाला जाग न आल्याचा आरोप आता ख्रिस्ती बांधवांकडून होत आहे. (प्रतिनिधी)