Join us

‘फोर्टचा राजा’ ठरला ‘मुंबईचा राजा’

By admin | Updated: September 8, 2014 02:07 IST

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित केलेल्या ‘मुंबईचा राजा’ या आॅनलाइन स्पर्धेत यंदा ‘फोर्टचा राजा’ने बाजी मारली आहे.

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित केलेल्या ‘मुंबईचा राजा’ या आॅनलाइन स्पर्धेत यंदा ‘फोर्टचा राजा’ने बाजी मारली आहे. रविवारी जाहीर झालेल्या निकालात तब्बल ४३ हजार ३९७ मते मिळवत श्री बालगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ‘फोर्टचा राजा’ हा यंदाचा ‘मुंबईचा राजा’ ठरला, तर सर्वोत्कृष्ट इकोफ्रेंडली गणेश मंडळाचे विजेतेपद गिरगावचा महाराजा अखिल मुगभाट मंडळाने मिळवले आहे.दरवर्षी एसएमएस आणि आॅनलाइन व्होटिंगच्या आधारावर ही स्पर्धा आयोजित केली जाते. अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधी स्पर्धेचा निकाल जाहीर होतो. रविवारी जाहीर झालेल्या निकालात फोर्टच्या राजाचे नाव मुंबईचा राजा म्हणून घोषित करण्यात आले, तर ‘लोअर परळचा लाडका’ म्हणून ओळख असलेल्या करी रोड येथील बालगोपाळ मंडळाने ४१ हजार ५७५ मते मिळवत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मान ३९ हजार ७२ मते मिळवलेल्या हुकमिलन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मिळाला आहे. शिवाय स्पर्धेत पाच उत्तेजनार्थ आणि एक सर्वोत्कृष्ट इकोफ्रेंडली गणेश मंडळाचे पारितोषिक दिले जाते. त्यातील उत्तेजनार्थमध्ये धोबीघाट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बेलासिस रोड बीआयटी चाळ सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ (मुंबई सेंट्रलचा राजा), घोडपदेव सार्वजनिक मंडळ (घोडपदेवचा राजा), श्री गोल देऊळ सार्वजनिक उत्सव मंडळ (गोल देऊळचा राजा), इंदिरानगर यंग क्लब (किंग आॅफ इंदिरानगर) या मंडळांनी स्थान मिळवले आहे. ‘गिरगावचा महाराजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरगावचा महाराजा अखिल मुगभाट मंडळाने यंदाचा सर्वोत्कृष्ट इकोफ्रेंडली गणेश मंडळाचा किताब पटकावला आहे. एकूण सजावट, मूर्ती आणि मंडपासाठी वापरले जाणारे साहित्य हे कितपत पर्यावरणपूरक आहे, या सर्व गोष्टींची पाहणी करून हा किताब देण्यात येतो. (प्रतिनिधी)