Join us  

अंधेरीच्या राजाचे संकष्टीला होणार विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 5:23 PM

विसर्जन मिरवणूक निघणार नाही

मनोहर कुंभेजकर

मुंबई : दरवर्षी संकष्टीला विसर्जन होणारा गणपती अशी अंधेरीच्या राजाची ख्याती आहे. दरवर्षी लाखो भक्त अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट लक्षात घेता आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पालिकेच्या व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. उद्या शनिवारी दि,5 रोजी सायंकाळी अंधेरीच्या राजाचे संकष्टीला होणार विसर्जन होणार असल्याची माहिती आझाद नगर उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक व पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश) फणसे यांनी  दिली. पालिकेच्या व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत यंदा येथील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 दरवर्षी अंधेरीच्या राजाची मूर्ती सुमारे 8 फूट असते मात्र मात्र यंदा येथील मूर्ती चार फूटांची आहे. नागरिकांनी दर्शनाला गर्दी करू नये आणि सर्वांना लांबून अंधेरीच्या राजाचे खुल्या मंडपातून दर्शन मिळण्यासाठी खास हायड्रालिक लिफ्टवर अंधेरीच्या राजाची मूर्ती विराजमान झाला असून  नागरिकांना लांबून देखिल सुलभ दर्शन मिळाले. तर यंदा स्वर्गाचा देखावा साकार केला होता. विशेष म्हणजे येथील गणेशोत्सवा बरोबरच आरोग्यत्सव समिती तर्फे साजरा करण्यात येत असून सलग 14 दिवस रक्तदान शिबीरांचे आयोजन केले आहे. प्रबोधन गोरेगावच्या माध्यमातून आयोजित या शिबीरात आज सायंकाळपर्यंत एकूण 185 बाटल्या रक्त जमा झाले अशी माहिती त्यांनी दिली.

दरवर्षी अंधेरीच्या राजाची हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत वाजत गाजत भव्य विसर्जन मिरवणूक संकष्टीला सायंकाळी 6 वाजता अंधेरीच्या राजाच्या मंडपातून निघते. 18 तासांच्या मिरवणुकीत नंतर दुसऱ्या दिवशी  वेसावे समुद्रात अंधेरीच्या राजाचे विसर्जन होते. मात्र यंदा कोरोनामुळे अंधेरीच्या राजाची नेहमीप्रमाणे  विसर्जन मिरवणूक निघणार नसून उद्या सायंकाळी  अंधेरीच्या राजाचे विसर्जन होणार आहे अशी माहिती त्यांनी शेवटी दिली. 

टॅग्स :गणेशोत्सवमुंबईअंधेरी