Join us  

कोरोनामुळे मजूर ‘किलर’ बनला; सुपारीच्या अपूर्ण रकमेने गोळीचा ‘नेम’ चुकवला, अभियंता वाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 8:38 AM

खांबीत यांच्यावर इतक्या जवळून गोळीबार करण्यात आला तरी त्यांना ती गोळी लागली कशी नाही, याप्रकरणी पोलीस तपास करत होते. त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न हल्लेखोराने केला असावा असाही संशय व्यक्त होत होता.

मुंबई : मीरा भाईंदर महापालिकेचे (एमबीएमसी) कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्या हत्येसाठी मुख्य शुटरला अपूर्ण रक्कम देण्यात आली. त्या रागात त्याने गोळीचा नेम चुकविला आणि खांबीत यांचा जीव वाचला, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. खांबीत यांच्यावर इतक्या जवळून गोळीबार करण्यात आला तरी त्यांना ती गोळी लागली कशी नाही, याप्रकरणी पोलीस तपास करत होते. त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न हल्लेखोराने केला असावा असाही संशय व्यक्त होत होता. मात्र, वीस लाखांच्या सुपारीत अजय सिंह या हल्लेखोराकडे अवघे आठ हजार पोहोचले त्यामुळे तो रागावला. एमबीएमसीचे माजी कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण मोहिते आणि यशवंत देशमुख यांनी खांबीतला मारण्यासाठी २० लाखांची सुपारी राजू विश्वकर्मा या आरटीआय कार्यकर्त्याच्या मदतीने दिली. त्याने अमित सिन्हा आणि अजय सिंह या कॉन्ट्रॅक्ट किलरशी त्यांचा संपर्क करून दिला. मोहिते आणि देशमुख यांनी १० लाख रुपये आगाऊ विश्वकर्माकडे सुपुर्द केले. मात्र, विश्वकर्माने सिन्हाला त्यातले २ लाख रुपये दिले, तर सिंगला ८ हजार रुपये पोहोच झाले. सिन्हा दुचाकी चालवत असताना सिंहने खांबीतवर हल्ला केला. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सिंह या व्यवहारामुळे नाराज होता, ज्याचा राग त्याने खांबीतऐवजी त्याच्या कारच्या काचेवर गोळीबार करत व्यक्त केला. विश्वकर्मा याने मारेकऱ्यांचे पैसे स्वतःकडे ठेवल्याचे त्यांना समजल्याने कारागृहातून बाहेर पडल्यावर याचा वचपा काढण्याची कथित धमकीही त्यांनी दिल्याचे समजते.कोरोनामुळे मजूर बनला ‘किलर’अजय सिंह हा मोलमजुरीचे काम करायचा; परंतु गेल्या दोन वर्षांच्या कोविड प्रतिबंधांमुळे कोणतेही काम त्याच्याकडे नव्हते. त्यामुळे नोकरी आणि पैशाचे आमिष देऊन सिन्हाने त्याला हत्येसाठी सोबत घेतले. कधीही बंदूक हातात न धरलेल्या सिंहला सिन्हाने मीरा भाईंदरमधील निर्जन ठिकाणी गोळीबाराचे प्रशिक्षण दिले.