ठाणे : मुंब्रा येथील रहिवासी महंमद रफीक इम्तियाज खान ऊर्फ शब्बीर (३०) याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. गोळीबारानंतर त्याला ठाण्याच्या साकेत रस्त्यावर जखमी अवस्थेत टाकले होते. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.भंगाराचा व्यवसाय करणारा रफीक कापूरबावडी पोलीस ठाण्याचे बिटमार्शल विलास कोयंडे आणि जाधव यांना जखमी अवस्थेत साकेत येथील सर्व्हिस रोडवर पहाटे ३.३०च्या सुमारास आढळला. त्याच्या पेहरावावरून तो मुस्लिम असल्याचा अंदाज पोलिसांना आला. त्याला तातडीने एका खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर जवळूनच गोळी झाडण्यात आल्याचे जखमेवरून निदर्शनास आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही झाला होता. सकाळी ८ वा.च्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंब्रा भागातील काही खबऱ्यांच्या मदतीने कापूरबावडी पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला. त्याची ओळख पटविण्यात आल्यानंतर मारेकऱ्यांच्या शोधासाठी कापूरबावडी पोलिसांच्या शोध पथकातील दोन पथके, गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती पथकातील एक, युनिट पाच आणि युनिट एक आणि विशेष कृती दल अशी सहा पथके तयार केली. मुंबई-नाशिक महामार्गावरील डाव्या बाजूकडे त्याला टाकले होते. पूर्ववैमनस्यातून मुंब्य्रातील चौघांच्या टोळक्याने हा खून केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे यातील आरोपींना लवकरच पकडले जाईल, असे कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी शब्बीरचा दोघांबरोबर वाद झाला होता. याच वादातून हा प्रकार घडल्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. (प्रतिनिधी)
मुंब्रा येथील तरुणाचा गोळ्या घालून खून
By admin | Updated: August 28, 2015 02:17 IST