नागोठणे : येथील मराठा आळीतील अभिनव अनंत चितळकर या सहा वर्षीय बालकाला पिसाळलेला कुत्रा चावल्याने त्याच्या डाव्या गालावर वीस टाके पडले आहेत. पहिल्या इयत्तेत शिकणारा अभिनव सायंकाळी शाळेतून घरी परत आल्यानंतर घराबाहेरील पायरीवर बसला होता. त्यावेळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर झेप घेतली आणि हाताला व गालाला चावा घेतला. शेजारी राहणाऱ्यांनी अभिनवची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली, मात्र तोपर्यंत कुत्र्याने अभिनवचे लचके तोडले होते. अभिनवच्या गालाला वीस टाके पडले असल्याचे त्याचे वडील अनंत चितळकर यांनी सांगितले. नागोठणे परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यांची परिसरात एक प्रकारे दहशतच निर्माण झाली आहे. रात्री-बेरात्री येणाऱ्या नागरिकांवरही हे कुत्रे हल्ले करीत असल्याच्या घटना परिसरात घडल्या आहेत. ग्रामपंचायतीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. मध्यंतरी महाड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने पाच-सहा नागरिकांना जखमी केले होते. पनवेल परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिक हैराण आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अथवा निर्बिजीकरणाबाबत कोणतेही ठोस निर्णय होत नसल्याने दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. गालाला वीस टाके४अभिनव घरासमोरील पायरीवर बसला असता, पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. त्यावेळी घाबरलेल्या अभिनवने आरडाओरड केल्याने शेजारच्या व्यक्तीने त्याची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. मात्र तोपर्यंत कुत्र्याने अभिनवच्या गालाचे आणि हाताचे लचके तोडले होते.
कुत्र्याच्या हल्ल्यात बालक गंभीर
By admin | Updated: March 25, 2015 22:57 IST