मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत खड्डे युद्ध रंगले आहे़ शह देणाऱ्या मित्रपक्षाला गाफिल ठेवून शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाची पाहणी करीत भाजपालाच खड्ड्यात घातले़ शिवसेनेचा हा डाव उलटविण्यासाठी भाजपाने आपल्या मंत्री महोदयांना रस्त्यावर उतरवित रस्त्यांची पाहणी केली़ तर दुसरीकडे मनसेने सेल्फी विथ खड्डे मोहीम घेत एका ठिकाणी ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना चोपले़भाजपाने मिशन २०१७ जाहीर करुन आपले इरादे स्पष्ट केले आहेत़ त्यामुळे खड्ड्यांचे खापर आपल्यावर फुटण्याआधी शिवसेनेने पश्चिम द्रुतगती महामार्गावरील रस्त्यांचा आज पाहणी दौरा ठेवला़ हे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असल्याने खड्ड्यांचे खापर भाजपावर फुटणार होते़ याची कुणकुण लागताच भाजपाचे धाबे दणणाले़ शिवसेनेचा हा गेम उधळण्यासाठी भाजपाने सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना रस्त्यांच्या पाहणीसाठी धाडले़एकीकडे महापौर स्रेहल आंबेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव रस्त्यांची पाहणी करीत होत्या़ त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना घेऊन भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड़ आशिष शेलार यांनी वांद्रेपासून दहिसरपर्यंतच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील रस्त्यांची पाहणी करीत आपण जागरुक असल्याचे दाखवून दिले़ या पाहणी दौऱ्यामुळे मित्रपक्षातच खड्डे युद्ध रंगल्याचे चित्र आहे़ मनसेचे रांगोळी आंदोलनकधी ठेकेदाराच्या माणसाला मारहाण तर कधी अधिकाऱ्यांना घेराव व अपहरण करण्याची धमकी देणाऱ्या मनसेने आज सेल्फी विथ खड्डे हे आंदोलन केले़ या मोहिमेंतर्गत वरळी, प्रभादेवी परिसरातील खड्ड्यांभोवती रांगोळी काढण्यात आली़ मुंबईत ६० च खड्डे असल्याचा पालिकेचा दावा खोडून काढण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले़ मात्र कांदिवली पूर्व येथे मनसेचे पदाधिकारी हेमंतकुमार कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्ते दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली़
मुंबईत पेटले खडडे युद्ध
By admin | Updated: July 8, 2016 19:44 IST