पारोळ : ढगाळ वातावरण झाल्याने वसई पूर्व भागातील खरीप पिकांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला असून आता पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जादा औषधाची फवारणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. याचा खर्च वाढल्यामुळे हवामान बदलाचे शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे.वसई परिसरात मोठ्या प्रमाणात वाल, तूर, मूग, घेवडा इ. कडधान्य त्याचप्रमाणे टोमॅटो, वांगी, सफेद कांदा, मिरची, भेंडी इ. भाज्यांचे उत्पादन आडणे, भाताणे, जांभूळपाडा, वसई, शिरवली, कळंभोण, वडघर इ. गावांत मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या वर्षी रेती व वीटभट्टी धंदे लयास गेल्याने अनेक शेतकरी खरीप पिकाकडे वळले आहेत. खरीप पिकाचे कीटक, खते, फवारणी, औषधे, मजुरी इ. महाग झाल्याने शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना त्यांच्या संकटामध्ये ढगाळ वातावरणामुळे आणखी भर घातली आहे. या हवामानात पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना जादा खर्च उभारावा लागणार आहे. त्याचप्रमाणे या भागातील शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाची शासकीय मदत मिळत नसून शेतकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊनही या भागातील बंधारे वेळेवर बांधले जातही नाहीत. त्यामुळे तानसा नदीचे पाणी खारे होऊन पीक वाया जाते. हा ही प्रश्न या भागातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. (वार्ताहर)
खरीप पीक धोक्यात
By admin | Updated: December 14, 2014 23:31 IST