Join us

खारघर टोलनाक्या विरोधात आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: June 2, 2014 04:45 IST

पनवेल-सायन महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्गावरील खारघर स्पॅगेटी येथे टोल उभारण्याचा घाट घातला आहे

पनवेल : पनवेल-सायन महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्गावरील खारघर स्पॅगेटी येथे टोल उभारण्याचा घाट घातला आहे. या टोलधाडीला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोध दर्शविला आहे. या निर्णयाची नाकाबंदी करा असे साकडे त्यांनी शासनाला घातला आहे. अन्यथा जनहितासाठी आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून शासनाला हा निर्णय मागे घेण्याशिवाय पर्यायच उरलेला नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पनवेल-सायन महामार्गाचे रुंदीकरणाचे काम जवळपास संपत आले असून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. हा महामार्ग दहा पदरी झाला असल्याने वाहने सुसाट वेगाने जातील असा दावा बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. प्रस्तावित आंतरराष्टÑीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर हे काम शासनाने हाती घेतले आहे. मानखुर्द ते कळंबोली असा एकूण ६३ किमी अंतराचे रुं दीकरणाचे काम गेल्या पावणे दोन वर्षांपासून सुरू आहे. वाशी ते कामोठा असे एकूण पाच उड्डाणपूल उभारले जाणार असून डिसेंबर २०१४ पर्यंत रुंदीकरणाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खारघर येथे टोल वसूल करण्याकरिता टोल नाका उभारण्याचा प्रस्ताव आहे. या संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेला सुरुवात झाली आहे. खारघर ग्रामपंचायतीनेही या प्रस्तावास विरोध केला आहेच. त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. स्थानिकांचा यामध्ये काहीच फायदा नसून त्यांनी पथकर का भरायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.