नवी मुंबई : अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय असलेल्या खारघर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक दिवस भाड्याच्या जागेत काम करणा-या खारघरच्या पोलीस कर्मचा-यांची चिंता कमी झाली आहे. मागील सहा वर्षांपासून से. १२ मधील भाड्याच्या रो हाऊसमध्ये खारघर पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू आहे .मागील सहा वर्षांपासून अपुऱ्या जागेत काम करावे लागत असल्यामुळे पोलिसांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. नव्या इमारतीचे काम १00 टक्के पूर्ण होऊनही या इमारतीचे उद्घाटन रखडल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांत नाराजी होती. आचारसंहितेचा खोडा आडवा आल्यामुळे नवीन सरकार स्थापन झाल्यावरच या नव्या वास्तूचे उद्घाटन होईल, अशी चर्चा असताना अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर हे पोलीस ठाणे सुरू होणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या हस्ते या पोलीस ठाण्याचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.याबाबत खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी पाटील यांंनी दुजोरा देत आम्ही सर्व प्रक्रि या पूर्ण करून येत्या ३ तारखेपासून सर्व कामकाज नवीन पोलीस ठाण्यात सुरू करणार असल्याचे सांगितले. नव्या इमारतीमध्ये तळमजल्यावर १४ व पहिल्या मजल्यावर १४ अशा एकूण २८ खोल्या येथे असून या प्रशस्त इमारतीत सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)
खारघर पोलीस ठाण्याला दसऱ्याचा मुहूर्त?
By admin | Updated: September 24, 2014 02:26 IST