Join us

तरुणावर गोळीबार करणारे चार आरोपी खारघर पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:24 IST

चारही जण काही दिवसांपूर्वी कोपरा गावात भाड्याच्या खोलीत वास्तव्याला आले होते. घटनेच्या वेळेस कोपरा गावाजवळील सीसीटीव्ही तपासले असता, चारही ...

चारही जण काही दिवसांपूर्वी कोपरा गावात भाड्याच्या खोलीत वास्तव्याला आले होते. घटनेच्या वेळेस कोपरा गावाजवळील सीसीटीव्ही तपासले असता, चारही जण कोपरा गावात शिरल्याची माहिती पोलिसांना मिळाले. त्या दिशेने तपास केल्यावर रविवारी या आरोपींना जेरबंद करण्यात आल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली. आरोपीकडून अग्निशस्त्र व जिवंत काडतुडे जप्त करण्यात आले आहेत. पेणमध्ये राहणारा हा तरुण इस्टेट एजंटचा व्यवसाय करणारा प्रतीक त्याच्या दुचाकीने खारघर या ठिकाणी फिरण्यासाठी आलेला होता. रात्री ११च्यादरम्यान वाशी येथून सायन पनवेल महामार्गाने पनवेलकडे जाताना कोपरा गाव बस स्टॉपच्या मागील रोडवर सिगरेट पीत असताना, त्या ठिकाणी तीन अनोळखी व्यक्तींनी त्याच्याकडे मोबाईल, पैसे व दुचाकीची मागणी केली. मात्र, प्रतीक याने यास विरोध केल्याने एकाने जबरदस्तीने त्याच्यापासून मोबाइल घेण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केला असता, एका आरोपीने प्रतीकच्या डाव्या पायाच्या मांडीवर गोळी झाडली होती.

या आरोपींना काही तासांतच अटक करून बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या या गँगच्या मुसक्या आवळण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. पोलीस निरीक्षक बिडवे, सहायक पोलीस निरीक्षक पढार, मानसिंग पाटील, नरेंद्र बेलदार आदींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाने ही कामगिरी बजावली.

चौकट -

हॉटेल व्यवसायासाठी निवडला शॉर्टकट

पोलिसांनी आरोपीना लुटमारीचे कारण विचारले असता, नव्याने हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी हा लुटमारीचा पर्याय निवडला असल्याचे या आरोपींनी कबूल केले. या लुटमारीच्या पैशातून हॉटेल सुरू करण्याचा विचार या आरोपींचा होता, अशी माहिती तपासात उघड झाली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.