पनवेल : अतिशय कठीण परिस्थितीत कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या गरजू विधवांसाठी खारघर ग्रामपंचायतीने मदतीचा हात पुढे केला आहे. या महिलांना महिला बालकल्याण निधीमधून दहा हजार रुपये मदत म्हणून देण्यात येणार आहे. नुकतेच ग्रामपंचायतीच्या बैठकीत यासंदर्भात ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे. या निधीच्या लाभार्थींसाठी उत्पन्न खर्चाची मर्यादा साठ हजार असणार आहे. या मर्यादेमध्ये बसणाऱ्या विधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. खारघर हद्दीतील लाभार्थी महिलांनी अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन उपसरपंच सोमनाथ म्हात्रे यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खारघरमधील वास्तव्याचा पुरावा, पतीच्या मृत्यूचा दाखला तसेच ६० हजारांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचा पुरावा आदी कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खारघर ग्रामपंचायत ओळखली जाते. यापूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना ग्रामपंचायतीने राबविल्या आहेत. आता महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक पाऊल उचलले आहे. (वार्ताहर)
खारघर ग्रामपंचायतीचा विधवांसाठी मदतीचा हात
By admin | Updated: July 4, 2015 01:03 IST