मलकापूर : ‘व्हीआयपीं’चा कऱ्हाड दौरा ही पोलिसांसाठी सध्या नित्याचीच बाब आहे़ बुधवारीही कऱ्हाडला मुख्यमंत्र्यांचा दौरा होता; पण या दौऱ्यावेळी जी दुर्घटना घडली, त्या दुर्घटनेने पोलीस दल हळहळले़ पोलिसांबरोबरच मुख्यमंत्र्यांनीही संवेदनशीलता दाखवली़ नियोजित कार्यक्रमांसाठी विमानतळाहून रवाना झालेले मुख्यमंत्री अपघातस्थळी थांबले़ त्यांनी जखमी पोलीस नाईक संतोष गवळी यांना त्वरित वैद्यकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले़कऱ्हाडच्या विमानतळावर बुधवारी सकाळी ११़३० वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आगमन झाले़ मुख्यमंत्री बंदोबस्तासाठी सकाळपासूनच पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती़ कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह महामार्ग पोलीस दलातील कर्मचारी ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते़ महामार्ग पोलिसांपैकी संतोष गवळी व अन्य काही कर्मचारी पाटण-तिकाटणे येथे अमित अॉटोमोबाईल दुकानासमोर वाहतूक नियंत्रण करत होते़ सकाळी ११़५० वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा आल्याचा निरोप गवळी यांना मिळाला़ यावेळी गवळी तातडीने वाहतूक थांबवण्यासाठी महामार्गावर धावले़ मात्र, काही कळण्याअगोदरच भरधाव ट्रकने त्यांना उडविले़ त्यानंतर ट्रक न थांबताच महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने गेला़ त्याचक्षणी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अपघातस्थळी पोहोचला़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह त्यांच्याबरोबर असलेले सर्वजण अपघातस्थळी थांबले़ पोलीस अधिकाऱ्यांनी ताफ्यातीलच रुग्णवाहिकेतून जखमी पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात हलविले़ तातडीने उपचार सुरू करण्याच्या सूचना करून मुख्यमंत्र्यांचा ताफा कोळे परिसरातील कार्यक्रमास मार्गस्थ झाला़ (प्रतिनिधी)शॉर्टकटने रुग्णवाहिका रुग्णालयात अपघातस्थळापासून हाकेच्या अंतरावर सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल आहे़ मुख्यमंत्र्यांचा ताफा येणार म्हणून या परिसरातील सर्व रस्त्यांवर वाहतूक अडविण्यात आली होती़ मात्र, अपघातानंतर सर्वांचीच धावपळ उडाली़ जखमी गवळी यांना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील रुग्णावाहिकेत घालून अमित आॅटोमोबाईल्सच्या शेजारील अरुंद रस्त्याने रुग्णवाहिका रुग्णालयाकडे नेण्यात आली़ यानंतर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.पाठलाग करून ट्रक पकडला पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन कोल्हापूरच्या दिशेने निघून गेलेल्या ट्रकबाबत कोल्हापूर नाक्यावरील पोलिसांना माहिती मिळाली़दरम्यान, अंकुश पाटील या दुचाकीस्वारासह एका अनोळखी चारचाकी वाहनचालकाने संबंधित ट्रकचा पाठलाग केला़ आरडाओरडा करीत एका बाजूने महामार्ग पोलीस तर दुसऱ्या बाजूने कऱ्हाड शहर पोलीस संबंधित ट्रक थांबविण्यासाठी प्रयत्न करीत होते़ खरेदी-विक्री पंपासमोर ट्रक अडवून चालकाला ताब्यात घेतले़ शासकीय पद्धतीने निरोप कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आलेल्या संतोष गवळी यांचे पार्थिव कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले़ त्याठिकाणी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली़ पोलीस दलाकडून आर्थिक मदतपोलीस नाईक गवळी यांना तीन मुली असून, सर्वात मोठी मुलगी सध्या चौथीच्या वर्गात शिक्षण घेत आहे़ गवळी कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी पोलीस दल सरसावले आहे़ कऱ्हाड उपविभागातील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याचा एक दिवसाचा पगार गवळी कुटुंबीयांना मदत म्हणून देण्यात यावा, अशी विनंती पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली आहे़रुग्णालयात नातेवाइकांचा आक्रोश अपघातानंतर संतोष गवळी यांच्या नातेवाइकांनी थेट रुग्णालयात धाव घेतली़ अडीच तासांतच उपचारादम्यान गवळी यांची प्राणज्योत मालवली़ त्यामुळे नातेवाइकांनी रुग्णालयातच आक्रोश केला़
‘खाकी’साठी दाखविली ‘खादी’ने माणुसकी !
By admin | Updated: September 25, 2014 00:19 IST