नवी मुंबई : राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा मीनाक्षी जयस्वाल यांची शुक्रवारी राहत्या घरी हत्या झाली. याप्रकरणी पोलिसांनी काहीच तासांत दोघांना अटक केली आहे. तर चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.खारघर येथील वास्तुविहार सोसायटीमध्ये मीनाक्षी जयस्वाल या एकट्याच राहत होत्या. त्यांचे पती संतोष जयस्वाल हे मालेगाव येथे न्यायाधीश असून, ते नाशिक येथे राहतात. शुक्रवारी दुपारी ते पत्नी मीनाक्षी यांना फोनवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे खारघरमध्येच राहणारे त्यांचे फॅमिली डॉक्टर संतोषकुमार जयस्वाल यांना त्यांनी त्या ठिकाणी पाठवले. त्या वेळी त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकासह श्वानपथक, ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. त्यानुसार अवघ्या सात तासांत पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा करून दोघांना अटक केली आहे. मनिंदरसिंग बाजवा (२२) आणि विनायक चव्हाण (४०) अशी त्यांची नावे आहेत. तर त्यांचा तिसरा साथीदार फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बाजवा व त्याच्या साथीदाराने चोरीच्या उद्देशाने मीनाक्षी यांची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे अपर पोलीस आयुक्त फतेसिंह पाटील यांनी सांगितले.खारघर सेक्टर १३ येथे राहणारा विनायक चव्हाण हा अनेक वर्षांपासून जयस्वाल कुटुंबीयांच्या परिचयाचा होता. त्यानुसार वेळप्रसंगी तो मीनाक्षी जयस्वाल यांचे वाहन चालवण्याचे काम करायचा. बाजवा व फरार असलेला हे दोघे चव्हाण याचे मित्र आहेत. १० दिवसांपूर्वीच मीनाक्षी जयस्वाल यांनी घराच्या डागडुजीचे काम करून घेतले होते. त्या वेळी चव्हाण याच्याच परिचयाने बाजवा व त्याच्या साथीदाराने तेथे विद्युतकाम केलेले. याच परिचयाचा गैरफायदा घेत शुक्रवारी दुपारी त्यांनी घरात प्रवेश मिळवला. परंतु घरात चोरी करीत असताना जयस्वाल यांनी प्रतिकार केल्यामुळे दोघांनी त्यांची हत्या केली. त्यानंतर घरातील सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज लुटला होता. त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल, असे अपर आयुक्त फत्तेसिंह पाटील यांनी सांगितले. त्यांनी हा गुन्हा चोरीच्या उद्देशाने केल्याची कबुली दिली असून, त्यामागे इतरही वेगळे काही कारण आहे का याचाही तपास सुरू असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेस उप आयुक्त संजयसिंह येनपुरे, साहाय्यक आयुक्त रणजित धुरे, शेषराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)च्बाजवा व त्याचा फरार साथीदार हे दोघेही गुन्हेगारी वृत्तीचे व व्यसनी असून, दोघांवर सुमारे दीड-दोन लाखांचे कर्ज आहे. या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा मीनाक्षी जयस्वाल यांच्या घरात चोरीचा कट रचला होता. च्त्यासाठी चव्हाण याच्या माध्यमातून त्यांच्यासोबत ओळख वाढवून सोसायटीच्या सुरक्षेचीही टेहळणी केली होती. त्यामध्ये इमारतीला सुरक्षारक्षक व जयस्वाल यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे पाहून त्यांनी आत्मविश्वासाने हा गुन्हा केला होता. परंतु घरामध्ये तसेच लिफ्टमध्ये त्यांचे रक्ताने भरलेल्या पायाचे उमटलेले ठसे पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोचण्याचा पुरावा ठरले.
कर्ज फेडण्यासाठी केली क्रूर हत्या
By admin | Updated: December 21, 2014 01:56 IST