Join us
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गसंपत्तीचा अमूल्य ठेवा!

By admin | Updated: June 7, 2015 01:16 IST

देशात पर्यावरणाबद्दल प्रचंड जागरूकता आलेली आहे. जसजशी लोकसंख्या वाढत आहे, नैसर्गिक स्रोतांवर दबाव वाढत आहे, त्याचबरोबरीने पर्यावरण

देशात पर्यावरणाबद्दल प्रचंड जागरूकता आलेली आहे. जसजशी लोकसंख्या वाढत आहे, नैसर्गिक स्रोतांवर दबाव वाढत आहे, त्याचबरोबरीने पर्यावरण वाचावे, जंगले नष्ट होऊ नयेत आणि वन्य प्राणी सुरक्षित राहावेत यासाठी विविध नागरी प्रयत्नही होत आहेत. पर्यावरणात प्राणी-पक्ष्यांचे महत्त्वाचे असे स्थान आहे. प्राणी-पक्ष्यांची ही वेगळीच दुनिया असते आणि ती किती सुंदर असते हे त्यात डोकावल्यावरच कळते. अशीच काहीशी वेगळी दुनिया ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या संग्रहालयात पाहण्यास मिळते.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी १३० हून अधिक वर्षे निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धनाचा वसा जोपासत आहे. या संस्थेत नैसर्गिक साधन-संपत्तीच्या शाश्वत, सशक्त समतोल विकासासाठी संशोधन व अभ्यास चालतो. या संस्थेच्या संग्रहालयात असंख्य पक्षी-प्राणी यांची छायाचित्रे, माहिती आहे. तसेच विविध झाडे, फळे, फुले यांचीही तपशीलवार माहिती आहे. निसर्गाचा इतिहास, जैवविविधता विषयांवरील हे मोठे संग्रहालय आहे. निसर्गासाठी काम करणारे तज्ज्ञ, विद्यार्थी आणि संशोधक विविध गोष्टींचे संशोधनही करतात.या संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे, या ठिकाणी विशिष्ट प्रदेशातील आणि कालखंडातील प्राणी-पक्ष्यांचे नमुने येथे आहेत. त्यात स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील काही अतिशय महत्त्वाच्या नमुन्यांचा समावेश आहे. त्या काळातील हे नमुने पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान म्यानमार आणि श्रीलंका येथील आहेत. या संग्रहातील नमुन्यांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वेगळी टीम कार्यरत आहे. नमुन्यांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून १०० वर्षांहून अधिक जुन्या नमुन्यांचे जतन करण्यात या टीमने निपुणता मिळवली आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राणी-पक्ष्यांच्या नमुन्यांचे संकलन असलेले हे देशातील मोठे संग्रहालय आहे. त्या वेळी वन्यजीव संरक्षण कायदा नव्हता, त्यामुळे हे शक्य झाले. मात्र, आता कायदा केला आहे तसेच उच्च प्रतीच्या कॅमेऱ्यात अगदी प्राणी-पक्ष्यांचे बारकावे टिपले जात असल्यामुळे त्यांना मारण्याची गरजही नाही. भारतात ब्रिटिशांचे राज्य असताना पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती-प्रजाती मोठ्या प्रमाणात होत्या. पण ब्रिटिश अधिकारी अनेक महत्त्वाचे पक्षी मायदेशी घेऊन गेले. शिवाय, काळानुरुप विविध घटकांमुळे प्राणी-पक्ष्यांची संख्याही घटली. त्यामुळे संग्रहालयातील हा ठेवा आपल्यासाठी अमूल्य असल्याचे संस्थेचे जनसंपर्क अधिकारी अतुल साठे यांनी सांगितले.संग्रहालयात देश-विदेशातील नमुन्यांचे संकलन करण्यात आले आहे. त्यात सुमारे १ लाख २० हजार नमुन्यांचा समावेश आहे. या संग्रहात २० हजार सस्तन प्राणी, २९ हजार पक्षी, ५ हजार ४०० पक्ष्यांची अंडी, ८हजार ५०० भूजलचर आणि ५० हजार सरपटणारे प्राणी आणि किटकांच्या नमुने उपलब्ध आहेत. तसेच, या संग्रहात दुर्मिळ आणि नामशेष झालेल्या प्राणी-पक्ष्यांचे नमुनेही उपलब्ध आहेत. त्यात माळढोक, जर्दन घोडा, गुलाबी घार, व्हाइट वूड बदक, बेंगॉल फ्लोरिकन अशा काहींचा समावेश आहे. या नमुन्यांना हाताळणे आणि अभ्यासणे सहज सोपे करण्यासाठी यांचा डेटा संगणकीय पद्धतीने संग्रह करण्यात आला आहे. या नमुन्यांचे वर्गीकरण जाती-उपजातींच्या आधारे करण्यात आले आहे. १८८३ मध्ये ६ ब्रिटिश आणि २ भारतीयांनी एकत्र येऊन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेची सुरुवात केली. सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनीही या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले. डॉ. सलीम अली यांच्या बरोबरीनेच बीएनएचएसचे नाव घेतले जाऊ लागले एवढे भरीव काम त्यांनी केले आहे. डॉ. अली सुमारे ७८ वर्षे या संस्थेचे अध्यक्ष होते. इतिहास वैभव- स्नेहा मोरे