Join us
Daily Top 2Weekly Top 5

समानतेसह वृद्धी हेच ध्येय ठेवा

By admin | Updated: February 3, 2015 02:07 IST

उद्योग जगताचे नेतृत्व करणाऱ्यांनी सीएसआर अर्थात सामाजिक जबाबदारीचे ध्येय साकारताना ‘समानतेबरोबर वृद्धी’ या संकल्पनेचा अंगीकार करावा,

मुंबई : उद्योग जगताचे नेतृत्व करणाऱ्यांनी सीएसआर अर्थात सामाजिक जबाबदारीचे ध्येय साकारताना ‘समानतेबरोबर वृद्धी’ या संकल्पनेचा अंगीकार करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी सोमवारी केले. इंडियन मर्चंट्स चेंबरतर्फे आयोजित वित्तीय परिषदेत ते बोलत होते. राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सोहळ्याला उपस्थिती होती. हमीद अन्सारी म्हणाले, दीर्घकालीन निरंतर विकास समानतेशिवाय साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्याशिवाय पुढे जाणे देशाला शक्य नाही, म्हणूनच सामाजिक सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा पर्याय निवडावा. उद्योगांचा थेट संबंध उत्पादन करणे, रोजगारनिर्मिती करणे आणि संपत्ती कमावणे यांच्याशी असला तरी कंपनी कायदा २०१३मध्ये सीएसआर अर्थात उद्योगांच्या सामाजिक जबाबदारीच्या कल्पनेचा समावेश करण्यात आला. एवढेच नाहीतर काही ठरावीक उद्योगांना सेवाकार्य अनिवार्य करण्यात आले. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या मते किमान ६ हजार भारतीय कंपन्यांनी सीएसआर अंतर्गत प्रकल्प हाती घेतले पाहिजेत. यासंबंधी हिशेब केला तर जवळपास २० हजार कोटी सामाजिक विकास कार्यासाठी खर्च करण्यास उपलब्ध होऊ शकतील.खासगी अथवा सार्वजनिक उद्योग क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांनी यामध्ये स्वेच्छेने योगदान देण्याची गरज आहे. कायद्याने अनिवार्य केले आहे, म्हणून सेवा प्रकल्प राबवला जाऊ नये. भारतात पारंपरिक पद्धतीने सामाजिक सेवा म्हणून अनेक वर्षे काम केले जात आहे. यामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक प्रकल्पांच्या माध्यमातून संस्थानिर्मिती तसेच सामाजिक विकास अंतर्भूत आहे. यापलीकडे जाऊन या सामाजिक कार्याचा संबंध थेट उद्योग व्यवसायाशी लावला पाहिजे. समाजातील दुर्बल घटकाच्या उत्थानासाठी अधिक साधनसामग्रीची उपलब्धता प्राधान्याने करून दिली पाहिजे. यामुळेच सामाजिक, सौहार्दता निर्माण होईल आणि समाजातील सुसंवाद राष्ट्राला अधिक वैभवशाली बनवेल, असा आशावादही हमीद अन्सारी यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)च्मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृद्धी आणि समानता याच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, दारिद्र्य निर्मूलन आवश्यक असून, यासंदर्भातील कार्यक्रमांसाठी निधी आर्थिक विकासातून निर्माण केला पाहिजे. च्उत्पादनवृद्धी, रोजगारनिर्मिती आणि कुशल मनुष्यबळ आदी क्षेत्रातील योगदानाबद्दल सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सहा मान्यवरांचा या वेळी इंडियन मर्चंट्स चेंबर्सच्या वतीने गौरव करण्यात आला.