Join us

केडीएमसीच्या अग्निशमन दलात ४ मिनी बंब

By admin | Updated: March 10, 2015 00:17 IST

कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या चार अग्निशमन केंद्रामध्ये १४ बंब आहेत. त्यात आणखी चार गाड्यांची भर पडली आहे.

डोंबिवली : कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या चार अग्निशमन केंद्रामध्ये १४ बंब आहेत. त्यात आणखी चार गाड्यांची भर पडली आहे. नव्याने खरेदी केलेल्या या गाड्यांमुळे केंद्राची क्षमता वाढणार असून आग विझवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे ही नवी गाडी अरुंद रस्त्याने मार्ग काढून घटनास्थळी पोहोचू शकते. नव्या गाडीची वैशिष्टे : आग लागलेल्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होतो, त्या ठिकाणी प्रकाशाची व्यवस्था नसते. रात्रीच्या वेळी आग विझविताना अंधारात अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागते. मिनी फायर इंजिनवर फ्लड लाईटची व्यवस्था असून दहा मीटर उंच शिडी आहे. मोठ्या फायर गाडीतून आगीवर प्रति मिनिटाला १८०० लिटर पाण्याचा मारा केला जायचा परिणामी, चार मिनिटातच ही गाडी रिकामी व्हायची. नव्या फायर इंजिन गाड्यांमध्येही टाकीची तेवढीच तरतूद आहे, मात्र आता त्यातून प्रति मिनिटाला ८० लिटर पाण्याचा मारा केला जाणार आहे. आग विझवताना घरातील मौल्यवान वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते परिणामी ते नव्या गाडीमुळे कमी प्रमाणात होईल. फायर इंजिनमध्ये असलेली कुलिंग सिस्टिम इटालियन तंत्रज्ञानावर आधारित आहे. अरुंद रस्ते असलेल्या किंवा एखाद्या गल्लीत आग लागल्यावर मोठ्या गाड्या आगीच्या ठिकाणी पोहोचण्यास अडचणी होत्या, नव्या गाड्या आकाराने लहान असल्याने अरुंद रस्त्यातूनही जाऊ शकतील अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली.५५ मीटरची अत्याधुनिक शिडी : महापालिकेने आग विझवण्यासाठी ५५ मीटर उंचीची अत्याधुनिक शिडी खरेदी केली आहे. तिची किंमत आठ कोटी आहे. ती लवकरच अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. यामुळे उंच मजल्याच्या इमारतीला लागलेली आग विझवणे शक्य होणार आहे. अशी होणार विभागणी : या गाड्यांना पासिंग नंबर आठवडाभरात मिळतील. त्यानंतर कल्याण- डोंबिवली पूर्व पश्चिम अशा चार ठिकाणी त्या गाड्या विभागून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सध्या या गाड्या दलाच्या आधारवाडी मुख्यालयात ठेवल्या आहेत.(प्रतिनिधी)