कर्जत : तालुक्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना, गैरकायद्याने देशी, विदेशी दारु ची विक्र ी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी एकाच दिवसात तीन ठिकाणी छापे टाकले. यात ४५ हजारांची देशी-विदेशी दारु पोलिसांनी जप्त केली आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीड येथील नरेश देशमुख हे त्यांच्या किराणा मालाच्या दुकानातून देशी-विदेशी दारुची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.आर. पाटील यांच्या पथकाने ५ सप्टेंबर रोजी देशमुख यांच्या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी देशमुख यांच्या दुकानात २८ हजारांच्या देशी, विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांनी नरेश देशमुख (२३) याला ताब्यात घेतले आहे. यानंतर पोलीस पथकाने पोटल येथील आदिवासी वाडीच्या डोंगर भागात छापा टाकला. यात तेथे हरिश्चंद्र वाघमारे हा एका नाल्याच्या बाजूला झाडाखाली एका प्लॅस्टिकच्या पिंपात गावठी दारु हाताळत होता. पोलिसांना पाहून तो सर्व साहित्य तेथेच टाकून पळाला. यात पोलिसांनी सात प्लॅस्टिकच्या पिंपातून चौदाशे लिटर गूळ नवसागरमिश्रित १६ हजारांची गावठी दारु जप्त केली.तर तिसऱ्या घटनेत पाली हद्दीतील आदिवासी वाडीत बायमा वाघमारे ही माळारानावर गावठी दारुचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी या वाडीवर छापा टाकला. तेव्हा माळावर ही महिला अॅल्युमिनियमच्या डब्यात दारु घेऊन विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्या महिलेला हटकले तेव्हा ती महिला तो डबा तेथेच टाकून पळाली. त्यात ३१५ रु. किमतीची गावठी दारु सापडली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेकायदा दारुविक्री करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. (वार्ताहर)
तीन दारू अड्ड्यांवर कर्जत पोलिसांचे छापे
By admin | Updated: September 8, 2014 00:05 IST