Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतच्या घशाला पडली कोरड!

By admin | Updated: March 29, 2015 22:29 IST

दुर्गम भाग असलेल्या कर्जत तालुक्यात ऐन मार्च महिन्यातच पाणीटंचाईने आ वासला आहे. तालुक्यातील आदिवासी भागातील पाणीटंचाई दूर करण्यात शासन अपयशी ठरले

विजय मांडे, कर्जतदुर्गम भाग असलेल्या कर्जत तालुक्यात ऐन मार्च महिन्यातच पाणीटंचाईने आ वासला आहे. तालुक्यातील आदिवासी भागातील पाणीटंचाई दूर करण्यात शासन अपयशी ठरले आहे. याचे सर्वाधिक चटके महिलावर्गाला सोसावे लागत आहेत. पाणीटंचाई लक्षात घेऊन कर्जत तालुका पाणीटंचाई निवारण समितीने कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार तालुक्यात तब्बल ३२ गावांमध्ये आणि ४२ वाड्यांत पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवणार आहे. तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती पहाता व काही भाग वगळता अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागलेले आहे. त्यावर मात करण्यासाठी केंद्र, राज्य सरकार तसेच जिल्हा परिषदेकडून नळपाणी योजना राबविल्या जात आहेत, तरी दुर्गम भाग आणि तळाशी गेलेल्या विहिरींमुळे नेहमीच उन्हाळा हा महिलावर्गासाठी डोक्यावरून पाण्याचे हंडे घेऊन जाणाराच ठरतो. त्या परिस्थितीचा अभ्यास करून कर्जत तहसील कार्यालय आणि पंचायत समिती तसेच पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार केला आहे. ३२ गावांचा समावेश करावा लागला आहे, तर आदिवासी पाडे आणि वाड्यामधील पाण्याची स्थिती भयावह अशीच आहे.