मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांच्यातील वाद आता अधिक चिघळत चालला आहे. सामंजस्याने घटस्फोट घेण्यासाठी दाखल केलेली याचिका करिश्माने काहीच दिवसांपूर्वी वांद्रे कुटुंब न्यायालयातून मागे घेतली. दोघांच्या वादाचे कारण ट्रस्ट फंड असल्याने आता हा वाद थेट दिवाणी न्यायालयात जाणार आहे.करिश्मा कपूरने २००३मध्ये उद्योजक संजय कपूर याच्याशी विवाह केला. मात्र या दोघांमधील वादामुळे हा विवाह फार काळ टिकू शकला नाही. या दोघांनीही २०१४मध्ये एकमेकांपासून सामंजस्याने घटस्फोट घेण्यासाठी वांद्रे कुटुंब न्यायालयात अर्ज केला. मात्र संजय मुलांच्या पालनपोषणासाठी न्यायालयाने ठरवून दिलेली रक्कम देत नसल्याचे कारण देत करिश्माने काहीच दिवसांपूर्वी घटस्फोटासाठी दिलेली संमती मागे घेतली. त्यामुळे आता हे प्रकरण दिवाणी न्यायालयात जाईल.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिश्मा आणि संजयने सामंजस्याने विवाह संपुष्टात आणण्यासाठी केलेल्या अर्जात दोघांनाही मुलांना वाटेल तेव्हा भेटण्याची तरतूद केली होती. तसेच मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी ट्रस्ट फंडमध्ये असलेल्या संजयच्या आर्थिक हिश्शातील काही हिस्सा मुलांच्या नावे जमा करण्यासंदर्भातही अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच मुले सज्ञान झाल्यावर दोघेही ट्रस्ट फंडचे ट्रस्टी म्हणून जाहीर करण्याची अटही करिश्माने संजयला घातली होती. मात्र आता करिश्माला स्वत:लाच ट्रस्ट फंडचे मालकी हक्क हवे आहेत. भविष्यात मुलांचे आणि संजयचे कोणत्याही प्रकारचे संबंध असू नयेत म्हणून करिश्माने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारी करिश्मा कुटुंब न्यायालयात सुमारे अर्धा तास उपस्थित होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता हे प्रकरण दिवाणी न्यायालयात चालविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
करिश्माचा घटस्फोट वाद दिवाणी न्यायालयात
By admin | Updated: November 29, 2015 02:45 IST