कल्याण : शहर विद्रुप करणाऱ्या बेकायदेशीर होर्डिंग्जविरोधात ठोस कारवाई करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तो अमलात आणण्यासाठी केडीएमसीने महापालिका स्तरावर प्रभागनिहाय जागरूक नागरिकांची समिती गठीत केली आहे. दर महिन्याला बैठका घेण्याचे समितीला निर्देश असताना गत सात महिन्यांत एकही बैठक न झाल्याने या समित्यांची स्थापना निव्वळ फार्स ठरला आहे.अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज आणि पोस्टरविरोधात ठोस कारवाई न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त का करण्यात येऊ नये, असा इशारा आॅगस्ट २०१४ मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने दिला होता. त्यात दिलेल्या निर्देशानुसार केडीएमसीने प्रभागनिहाय समिती स्थापन केली. अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्जवर लक्ष ठेवणे व या बाबींकडे महापालिका प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांचे लक्ष वेधणे तसेच त्याबाबतीत जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविण्याचे काम या समितीकडून अपेक्षित आहे. दरम्यान, उपायुक्त सुरेश पवार यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता बैठका आणि कारवाई सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
केडीएमसीचा होर्डिंग्ज हटावचा फार्सच
By admin | Updated: May 8, 2015 00:20 IST