Join us

कणकवली एस.टी. प्रशासन सज्ज

By admin | Updated: August 11, 2014 22:00 IST

गणेशोत्सवाचे नियोजन : ४00 जादा गाड्या, तळेरे येथे चेकपोस्ट

कणकवली : कोकणातील महत्वपूर्ण अशा गणेशोत्सवासाठी एस. टी. प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्गसह कोकणात येण्यासाठी १८९५ गाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४०० गाड्या आरक्षित करण्यात आल्या असल्याची माहिती एस. टी. चे विभागीय वाहतूक अधिकारी शाहू भोसले यांनी दिली.प्रवाशांच्या सेवेसाठी एस. टी. ने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन केले आहे. याबाबत शाहू भोसले यांनी माहिती दिली. यावेळी कणकवली एस. टी. आगार व्यवस्थापक एस. डी. भोकरे, अशोक राणे, प्रमोद यादव, सुरेश बिले आदी अधिकारी उपस्थित होते.शाहू भोसले म्हणाले, गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या प्रवाशांकडून एस. टी. ला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. ग्रुप बुकींगद्वारे गाड्या आरक्षित केल्या जात आहेत. आतापर्यंत ३६५ गाड्या मुंबई तसेच इतर भागातून कोकणात येण्यासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. ही संख्या ४०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत २९६ गाड्यांचे ग्रुप बुकींग करण्यात आले आहे. ही संख्याही ३५० पर्यंत जाईल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात येण्यासाठी १८९५ गाड्यांचे बुकींग झाले आहे. यामध्ये २४ आॅगस्ट रोजी ६ गाड्या, २५ आॅगस्ट रोजी ६५ गाड्या, २६ आॅगस्ट रोजी ४७३ गाड्या, २७ आॅगस्ट रोजी ११५८ गाड्या तर २८ आॅगस्ट रोजी १९३ गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार परतीच्या प्रवासासाठी गाड्यांची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. एका गाडीच्या आरक्षणासाठी किमान ४४ प्रवाशांची आवश्यकता असल्याचेही भोसले यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, बसस्थानकावर मंगलमय वातावरण या कालावधीत असावे यासाठी सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच बसस्थानक परिसरातील खड्डेही बुजविण्यात येणार आहेत. पिण्याचे पाणी, गाड्यांची माहिती देण्यासाठी उद्घोषणा अशा सुविधाही प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रवाशांना आपल्या मूळ गावी जाता यावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, नांदगांव, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी या रेल्वे स्थानकांवरही एस. टी. च्या गाड्यांची सोय करण्यात येणार आहे.मुंबई व उपनगरातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी गणेशोत्सवाच्या कालावधीत अनेक गाड्या सुरु करण्यात येणार आहेत. यापैकी २४ ते २९ आॅगस्ट या कालावधीत सायंकाळी ४.३० वाजता बोरिवली-सावंतवाडी, २५ ते २८ आॅगस्ट या कालावधीत दुपारी ३ वाजता बोरिवली-आरोंदा, २१ ते २८ आॅगस्ट या कालावधीत सायंकाळी ३.४५ वाजता बोरिवली-कुडाळ, २३ ते २८ आॅगस्ट या कालावधीत दुपारी ३.३० वाजता बोरिवली-मालवण. २४ ते २८ आॅगस्ट या कालावधीत सायंकाळी ५ वाजता बोरिवली-कणकवली, २४ ते २८ आॅगस्ट या कालावधीत सायंकाळी ५.०५ वाजता बोरिवली-नरडवे, २३ ते २९ आॅगस्ट या कालावधीत सायंकाळी ५.४५ वाजता बोरिवली-देवगड तर याच कालावधीत सायंकाळी ४ वाजता कुर्ला-देवगड, २६ ते २८ आॅगस्ट या कालावधीत सायंकाळी ४.१५ वाजता बोरिवली-तळेरे-विजयदुर्ग. २४ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ७ वाजता बोरिवली आंबेरीमार्गे विजयदुर्ग. २४ ते २८ आॅगस्ट या कालावधीत सायंकाळी ७.३० वाजता चिंचवड-दोडामार्ग तर २४ ते २८ आॅगस्ट या कालावधीत रात्री ८.१५ वाजता चिंचवड-मालवण अशा गाड्यांची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. बोरिवली-विजयदुर्ग ही गाडी ३० आॅगस्ट रोजी सोडण्यात येणार नाही. सिंधुदुर्गातून परतीच्या प्रवासासाठी ४ ते ७ सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी ४ वाजता देवगड-कुर्ला, दुपारी ३.३० वाजता देवगड-बोरिवली, दुपारी ३.३० वाजता मालवण-बोरिवली, सायंकाळी ५ वाजता मालवण-चिंचवड, दुपारी ३.३० वाजता कुडाळ-बोरिवली, दुपारी ३ वाजता वेंगुर्ले-बोरिवली, दुपारी ३.३० वाजता सावंतवाडी-बोरिवली, सायंकाळी ५ वाजता कणकवली-बोरिवली, सायंकाळी ५.३० वाजता दोडामार्ग-चिंचवड, दुपारी ३.३० वाजता नरडवे-बोरिवली अशा गाड्या सोडण्यात येणार आहेत. २३ आॅगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ७ वाजता विजयदुर्ग-आंबेरी-बोरिवली ही गाडी सोडण्यात येणार असून २९ आॅगस्ट रोजी विजयदुर्ग-बोरिवली ही गाडी सोडण्यात येणार नाही. (वार्ताहर)एस.टी. कडून पेट्रोलिंगबांदा ते राजापूर या भागात २४ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत एस. टी. च्या चार गाड्यांद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.-पर्यवेक्षकांसह चालक तसेच तांत्रिक कर्मचारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. -गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेरे येथे एस. टी. कडून चेकपोस्ट उभारण्यात येणार आहे. -२५ आॅगस्ट रोजी या चेकपोस्टचा शुभारंभर करण्यात येणार असून याठिकाणी ब्रेकडाऊन व्हॅन उपलब्ध राहणार आहे.- इतर कर्मचारीही तैनात करण्यात येणार आहेत. २४ तास सुरु राहणारे हे चेकपोस्ट ४ सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासासाठी निघणाऱ्या एस. टी. च्या प्रवाशांच्या सेवेत कार्यरत होणार आहे.