Join us

कांजूरमार्गच मेट्रो कारशेडसाठी व्यवहार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:06 IST

आरे संवर्धन समितीचे मत : जमीन, पैसा, पर्यावरण वाचणारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे कारशेड ...

आरे संवर्धन समितीचे मत : जमीन, पैसा, पर्यावरण वाचणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे कारशेड नक्की कुठे हाेणार? या प्रश्नाचे उत्तर कांजूरच्या वादानंतर मिळणे तूर्तास अवघड असले, तरी कांजूरमार्गला मेट्रोचे कारशेड झाले, तर व्यावहारिकदृष्ट्या काय फायदे होतील? हे आरे संवर्धन समितीने उदाहरणासह पटवून दिले असून, समितीच्या दाव्यानुसार कांजूरमार्ग येथे मेट्रो- ३, ४ आणि ६ चे कारशेड झाले, तर जमीन, पैसा आणि पर्यावरण वाचणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी यापूर्वी असे म्हटले होते की, कोणतीही गोष्ट इंजिनीअरिंगसाठी अशक्य कधीच नसते. केवळ इच्छाशक्ती लागते. ही इच्छाशक्ती यापूर्वी नव्हती का? सरकार बदलल्यानंतर ही इच्छाशक्ती आली का? त्यानंतर, डबल डेकर कारशेडचा मुद्दा पुढे आला. आज जगामध्ये जेथे कुठे आयलँड सिटी आहेत, जेथे कुठे जागेची कमतरता आहे, उदा. हाँगकाँग असो, नेदरलँड असो, जेथे मेट्रो ऑपरेशमध्ये आहे, तेथील उदाहरणे आपण पाहिली, तर कारशेडवर रहिवासी इमारती आहेत. व्यावसायिक संकुल आहेत. म्हणजे कारशेडवर काहीही होऊ शकते. पोडीयम होऊ शकते. एका अर्थाने, मेट्रोसाठीच्या कारशेड आणि वर जे काही सांगितले, ते सर्व कांजूरच्या जागेवर शक्य आहे. म्हणजे जमीन वाचविण्याच्या दृष्टीने कांजूर व्यावहारिक आहे, असे मत आरे संवर्धन समितीने मांडले.

कांजूरमार्ग जमिनीवर १९८० सालापासून मीठ तयार केले जात नाही. ती जमीन पडीक आहे. येथील झोपड्यांतून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे येथे गवत उगवत आहे. याला जैवविविधता म्हणायची का? येथे बेडूक असतील, साप असतील. या जैवविविधतेची आरेसोबत तुलना करणार का? कायद्यानुसार संरक्षित असणाऱ्या कोणत्याच प्रजाती येथे आढळत नाहीत. येथे एकही झाड नाही. त्यामुळे ही जमीन पर्यावरणाच्या दृष्टीने व्यावहारिक आहे.

आरेमध्ये मेट्रोच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आरेमधीलच भूगर्भातील पाणी वापरले जाणार होते. मात्र, कांजूर येथे लगत खाडी असल्याने त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी मेट्रोच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वापरता येईल. मुबलक पाण्याचा पुरवठा आहे. प्लांटद्वारे खाडीतले पाणी वापरू शकता. तेच पाणी पुन्ह खाडीत सोडू शकता. यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही.

आर्थिकदृष्ट्या विचार करायचा झाल्यास मेट्रो-४ची कारशेड मोगरापाडा येथे होणार होती. येथे शेकडो वर्षांपासून शेती केली जाते. परंपरागत शेती केली जाते. १८७ शेतकऱ्यांची जमिनी येथील कारशेडसाठी घ्यावी लागली असती. यासाठी १ हजार ५०० ते २ हजार कोटी खर्च अपेक्षित होता. हे प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए. राजीव यांनीच सांगितले होते. म्हणजे ही कारशेड येथे झाली असती, तर २ हजार कोटी रुपये खर्च झाला असता. कारशेड कांजूरला झाली, तर हे सगळे पैसे वाचतील. जमीन वाचेल, असे सर्व मुद्दे आरे संवर्धन समितीचे रोहित जोशी यांनी मांडले. या सर्व घटकांचा प्रामुख्याने विचार करावा, अशी त्यांची मागणी आहे.

-------------------

किती जागा वाचते...?

मेट्रो ३ साठी आरेत ६६ हेक्टर जमीन दिली होती.

मेट्रो-४ साठी ४५ हेक्टर मोगरपाड्याला दिली.

मेट्रो-४ अ साठी मोगरपाड्याला २५ हेक्टर जागा लागेल.

मेट्रो-६ साठी २५ हेक्टर.

एकूण जमीन पकडली, तर १०० हेक्टरवर जागा लागते.

कांजूरची जागा ४१ हेक्टर आहे.

आता या जागेवर वरील सर्व मेट्रोसाठी कारशेड येणार असेल, तर किती तरी जागा वाचेल.

...............................................