Join us

शहरात काँगे्रसला खिंडार

By admin | Updated: January 24, 2015 01:13 IST

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत काँगे्रसला खिंडार पडले आहे.

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत काँगे्रसला खिंडार पडले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी सिडको संचालक नामदेव भगत यांनी अंतर्गत मतभेदांना कंटाळून शिवसेनेत प्रवेश केला आहे. अजून काही पदाधिकारी नजीकच्या काळात पक्षाला रामराम करण्याची शक्यता असून याचा फटका काँगे्रसला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईमध्ये बहुतांश सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठे स्थित्यंतर होणार असल्याचे स्पष्ट झाले असून त्याची सुरवात काँगे्रसपासून झाली आहे. मागील काही दिवसांपासून सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत हेही पक्षात नाराज होते. पक्षांतर्गत मतभेदांना कंटाळून अखेर त्यांनी शुक्रवारी षण्मुखानंद सभागृहात उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. युवक काँगे्रसपासून पक्षाचे काम सुरू केलेल्या भगत यांनी युवक काँगे्रस अध्यक्ष, काँगे्रस अध्यक्ष, नगरसेवक, विरोधी पक्षनेते, सिडको संचालक ही पदे भूषविली आहेत. २००९ च्या निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी काँगे्रसच्या तिकिटावर निवडणूक लढली होती. परंतु पक्षातील काही मोठ्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये इतर पक्षाचे काम केले होते. निवडणुकीस उभे करून उघडे पाडल्यामुळे भगत व त्यांचे समर्थक नाराज होते. यापूर्वी महापालिकेमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळीही पक्षातील एका गटाने विरोधात काम केल्याचा त्यांचा आरोप आहे. वाशीमधील पोटनिवडणुकीमध्येही काँगे्रसने पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले होते. नवी मुंबईत पक्षाची जबाबदारी असणारेच पक्षाच्या विरोधात काम करत असल्यामुळे ते नाराज होते. याचमुळे त्यांनी पक्ष सोडल्याचे सांगितले. नामदेव भगत यांच्या पक्षांतरामुळे काँगे्रसमधील मतभेद पुन्हा उघडकीस आले आहेत. सद्यस्थितीमध्ये त्यांच्यासोबत कोणी गेले नसले तरी नजीकच्या काळात नगरसेविका इंदुमती भगत, नगरसेवक अमित पाटील व इतर अनेक पदाधिकारी अधिकृतपणे शिवसेनेत जातील. याशिवाय पक्षातील अजून दोन नगरसेवकही पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे शहरात काँगे्रसची ताकद कमी होणार आहे. यापूर्वी जनार्दन सुतार व संगीता सुतार यांनी पक्ष सोडताना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर टीका केली होती. त्यानंतर आता भगत यांनीही स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आक्षेप घेतल्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँगे्रसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)च्नवी मुंबई काँगे्रसचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी सांगितले की, काँगे्रसने नामदेव भगत यांना सर्व काही दिले होते. जिल्हा अध्यक्ष, सिडको संचालक व इतर सर्व पदे दिली होती. यानंतर त्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी पक्ष सोडणे व जाताना पक्षाला बदनाम करणे योग्य नाही. काँगे्रस नवी मुंबईत चांगली उभारी घेवून महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.