Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्याची कंगनाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:06 IST

मानहानी दावा : जावेद अख्तरांवर खंडणी मगितल्याची तक्रारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या मानहानी ...

मानहानी दावा : जावेद अख्तरांवर खंडणी मगितल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या मानहानी दाव्यावरील सोमवारच्या सुनावणीस अखेरीस बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने हजेरी लावली. गेल्या आठवड्यात न्यायालयाने अटक वॉरंट जारी करण्याची तंबी दिल्यानंतर कंगनाने अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावली.

कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी या मानहानी दाव्यावरील सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्यासाठी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केल्याची माहिती अंधेरी न्यायदंडाधिकाऱ्यांना सोमवारी दिली. कंगना रनौतचा न्यायलयावरचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे या दाव्यावरील सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्यासाठी तिने अर्ज केला आहे. त्याशिवाय कंगना हिने अख्तर यांच्याविरोधातही खंडणी आणि गुन्हेगारी धमकीचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे, अशीही माहिती सिद्दिकी यांनी न्यायालयाला दिली.

कंगना हिच्यावरील गुन्हा अदखलपात्र, जामीन मिळण्याजोगा असतानाही न्यायालय तिला ‘हजर न राहिल्यास अटक वॉरंट जारी करण्यात येईल’, असे म्हणत अप्रत्यक्षात धमकी देत आहे. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात प्रत्येक सुनावणीला तिला प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद सिद्दिकी यांनी केला.

कंगना दाव्यावरील सुनावणीस विलंब करण्यासाठी दरवेळी नवी कारणे घेऊन येते. न्यायालयाने तिला समन्स बजावताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे, असे अख्तर यांचे वकील जय भानुशाली यांनी म्हटले. दाव्यावरील सुनावणी वर्ग करण्याच्या अर्जावर सुनावणी घेण्यात आल्यानंतरच या दाव्यावर सुनावणी घेतली जाईल, असे म्हणत न्यायालयाने दाव्यावरील सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी ठेवली. तर कंगनाच्या दाव्यावरील सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्याच्या अर्जावरील सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी १ ऑक्टोबर रोजी घेणार आहेत.