Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुनावणीस अनुपस्थित राहण्यासाठी कंगनाचा दंडाधिकारी न्यायालयात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:06 IST

जावेद अख्तर मानहानी दावालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची ...

जावेद अख्तर मानहानी दावा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची मुभा मिळावी, यासाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला आहे.

कामानिमित्त देशभरात व परदेशात फिरावे लागते. दरवेळी सुनावणीला उपस्थित राहावे लागले तर कितीतरी मैलांचा प्रवास करून मला मुंबईला यावे लागेल. यासाठी मोठा त्रास होईल, असे कंगनाने अर्जात म्हटले आहे.

अर्जदार कामावर उपस्थित राहू शकली नाही तर तिचे व प्रोडक्शन हाऊसचे मोठे आर्थिक नुकसान होईल, असे कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी २७ जून रोजी ठेवली आहे.

जावेद अख्तर यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कंगना विरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. कंगनाने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली बदनामी केली आणि आपली प्रतिष्ठा मलिन केली, असा आरोप जावेद अख्तर यांनी केला आहे.

.....................