Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाला सुनावणीस अनुपस्थित राहण्याची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्याच्या सुनावणीस अनुपस्थित राहण्याची सवलत अभिनेत्री कंगना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्याच्या सुनावणीस अनुपस्थित राहण्याची सवलत अभिनेत्री कंगना राणावत हिला दंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी दिली. मात्र, पुढील सुनावणीस न चुकता हजर राहा, असे न्यायालयाने कंगनाला स्पष्ट बजावले.

जावेद अख्तर यांच्या वकिलांनी कंगनाविरोधात अटक वॉरंट बजावण्याची विनंती न्यायदंडाधिकारी आर.आर. खान यांना केली. मात्र, न्यायालयाने त्यांची ही विनंती फेटाळली. जर कंगना पुढील सुनावणीस उपस्थित राहिली नाही, तर तुम्ही हा अर्ज करा, असे म्हणत न्यायदंडाधिकारी यांनी या दाव्यावरील पुढील सुनावणी १ सप्टेंबर रोजी ठेवली.

कंगनाने आपल्याला कायमस्वरूपी सुनावणीस अनुपस्थित राहण्याची मुभा मिळावी, यासाठी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला आहे. मंगळवारच्या सुनावणीत अख्तर यांच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली मानहानी केली, तसेच आपली प्रतिमा मलिन केली, असा आरोप करत, जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात मानहानी दावा दाखल केला.