Join us  

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, कांदिवलीतील अपघाताचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 6:26 AM

रात्रीच्या मुसळधार पावसात जोगेश्वरीत एसी दुरुस्तीच्या कामासाठी दोघे दुचाकीवरून निघाले. पश्चिम द्रुतगती मार्गावरून जात असतानाच, अचानक भरधाव ट्रकच्या धडकेत एक जण रस्त्याकडेला पडला, तर दुचाकीसह चालक ट्रकच्या टायरखाली आला.

- मनीषा म्हात्रेमुंबई - रात्रीच्या मुसळधार पावसात जोगेश्वरीत एसी दुरुस्तीच्या कामासाठी दोघे दुचाकीवरून निघाले. पश्चिम द्रुतगती मार्गावरून जात असतानाच, अचानक भरधाव ट्रकच्या धडकेत एक जण रस्त्याकडेला पडला, तर दुचाकीसह चालक ट्रकच्या टायरखाली आला. दुचाकीप्रमाणे चिरडणार तोच त्याच्या हाती ट्रकचा अँगल लागला. आणि त्यालाच धरून तो ५० फुटांपर्यंत फरपटत गेला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती म्हणून तो या अपघातातून बचावला. अशी एखाद्या हिंदी चित्रपटातील थरारक दृश्याप्रमाणे वाटणारी घटना कांदिवलीत शुक्रवारी घडली.मीरा रोड परिसरात राहणारा समीर रऊस सिद्दिकी (२२) हा एसी दुरुस्तीचे काम करतो. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जोगेश्वरीत एसी दुरुस्तीसाठी त्याला कॉल आला. तो मित्र उस्मान उमराव खानसोबत दुचाकीवरून जोगेश्वरीच्या दिशेने निघाला. रात्री साडेबाराच्या सुमारास पश्चिम द्रुतगती मार्गावरून जात असताना कांदिवली परिसरात डावीकडील कारने उजव्या दिशेने वळण घेतले. त्यामुळे दुचाकी उजवीकडे घेताना पाठीमागील ट्रकने त्यांना धडक दिली. यात मागे बसलेला उस्मान रस्त्याकडेला उडाला. तर समीर दुचाकीसह ट्रकच्या टायरखाली आला. दुचाकीप्रमाणे तोही ट्रकखाली चिरडणार तोच त्याच्या हाती ट्रकचा पुढील अँगल लागला. या प्रकाराबाबत अनभिज्ञ असलेला ट्रकचालक तसाच भरधाव वेगाने जात होता. समीरचा ट्रक थांबविण्यासाठी आकांत सुरू होता. मात्र ट्रकचालकापर्यंत त्याचा आवाज पोहोचला नाही. अखेर ५० फुटांपर्यंत फरपटत गेल्यानंतर ट्रक थांबला आणि समीरने बाहेर उडी घेतली.जखमी अवस्थेत त्याने मित्राकडे धाव घेतली. तेव्हा मित्र रस्त्याकडेला जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याने स्वत:च्या वेदना बाजूला सारून मित्राला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी धडपड सुरू केली. मात्र कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. अखेर एका रिक्षाला जबरदस्ती थांबवून त्याने जवळचे रुग्णालय गाठल्याचे समीरने सांगितले. पुढे उस्मानला रुग्णालयात नेताच समीरही बेशुद्ध झाला. त्यालाही रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. सध्या दोघेही या अपघातातून बचावले आहेत.शुद्धीवर आल्यानंतर मित्राबाबत विचारणाशुद्धीवर आल्यानंतर समीरने पहिले मित्राबाबत विचारणा केली. दोघेही लहानपणीचे जीवलग मित्र असल्याचे समीरने सांगितले. सध्या दोघेही सुखरूप आहेत.ट्रकचालकाला अटक घटनास्थळी दाखल झालेल्या समतानगर पोलिसांनी या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात ट्रकचालक रियाजउद्दीन मन्सुरी याला अटक केली आहे.

टॅग्स :अपघातमुंबई