- मनोहर कुंभेजकरमुंबई - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल कांदिवली (पूर्व) येथील कामगार विमा योजना हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील व्यवस्था व साधने आणि भविष्यात करावयाचा विस्तार यावर अधिकाऱ्यांसोबत आणि रुग्णालयातील डॉक्टरांसोबत विस्तृत चर्चा केली. येथे ५०० बेडचे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालेल आणि या हॉस्पिटलचे रुपडे पालटले असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्य कामगार विमा योजनेचा लाभ केंद्र व महाराष्ट्रातील पात्र कर्मचारी घेतात. भविष्यात याचा विस्तार व या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सुद्धा उपचाराचा लाभ घेतील, या बाबत केंद्र व राज्य सरकार स्तरावर पाठ पुरावा करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले. यावेळी उत्तर मुंबई भाजप अध्यक्ष गणेश खणकर तसेच भाजपाचे आप्पा बेलवलकर, बाबा सिंह,निखिल व्यास आदी पदाधिकारी उपस्थित होते.