Join us

कामोठेत सर्व्हिस रोड अपूर्ण

By admin | Updated: June 11, 2015 22:52 IST

पनवेल-सायन महामार्गावर अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे कामोठ्यातील रहिवाशांना शहरात प्रवेश करताना कळंबोलीतील पुलाखालून वळसा घालून जावे लागत आहे.

कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावर अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे कामोठ्यातील रहिवाशांना शहरात प्रवेश करताना कळंबोलीतील पुलाखालून वळसा घालून जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पनवेल-सायन महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने दोन-तीन वर्षांपूर्वी रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वानुसार हा महामार्ग दहा पदरी करण्यात आला आहे. या २३ कि.मी. अंतरावर काही ठिकाणी उड्डाणपूलही उभारण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रस्ता वाहतुकीसाठी खुला करून टोल वसुलीही करण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. कामोठे वसाहतीलगतच्या सर्व्हिस रोडचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे कामोठेकरांना मुंबई बाजूकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाच्या प्रवेशावर जावे लागत आहे. त्याचबरोबर बसथांबाही पुलाच्या तोंडाजवळ असल्याने, मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक प्रवाशांकडून होत आहे.