Join us
Daily Top 2Weekly Top 5

कामतांचा 'संन्यास', आणि संजय निरुपमांचा 'इतिहास'

By admin | Updated: June 10, 2016 12:24 IST

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस गुरुदास कामत यांच्या राजकीय संन्यासामुळे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना हटवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे

शिवराज यादव, ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 08 - माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस गुरुदास कामत यांनी राजकीय संन्यास घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रस नेते गुरुदास कामत यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत असली तरी यामुळे काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना हटवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे. गुरुदास कामत यांच्या समर्थनार्थ 25 नगरसेवकांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसवर नामुष्की ओढवली आहे. अगोदरच अडचणीत असलेली काँग्रेस संजय निरुपम यांना हटवणार का ? याचं उत्तर येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. 
 
मुंबई काँग्रेसमध्ये अनेक वर्षे गुरुदास कामत आणि मुरली देवरा यांचे प्रभावी गट कार्यरत होते. सध्याचे मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपम आणि कामत यांच्यातील मतभेदही समोर आले आहेत. मध्यंतरी निरुपम यांना हटविणार असल्याच्या बातम्या होत्या; पण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबई भेटीत निरुपम यांना अभय दिले होते. त्यामुळे नाराज झालेले कामत गेल्या काही दिवसांपासून पक्षापासून लांबच होते.
काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून सोनिया गांधींनी कामत यांच्याकडे राजस्थान व गुजरातचे प्रभारीपद सोपवले होते. या दोन्ही राज्यांतील काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांत कामत यांनी जाण आणली. प्रत्येक जिल्ह्यात फिरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना यश मिळवून दिले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे दोन्ही राज्यात काँग्रेसची स्थिती सुधारत आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधींनी कामत यांच्या कार्यशैलीची जाहीर तारीफही केली होती.
त्याचवेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम मात्र पक्ष संकटात असूनही कामत यांच्या सहकारी कार्यकर्त्यांचे पंख छाटत सुटले होते. कामतांच्या लोकसभा मतदारसंघातही निरुपम यांनी हस्तक्षेप सुरू केल्यानंतर ते संतापले होते. यासंबंधी अनेकदा तक्रारी करूनही आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच कामत यांनी राजीनामाअस्त्र परजून झटका दिला.
 
वर्धापनदिनालाच निरुपमांनी केली काँग्रेसची नाचक्की -
काँग्रेसचा स्थापना दिवस असतानाच पक्षाच्या मुंबई विभागाच्या ‘काँग्रेस दर्शन’ या मुखपत्रात पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काश्मीर धोरणावर या नियतकालिकात टीका केली होती. तसंच सोनिया गांधी यांचे वडील हे फॅसिस्ट सैनिक होते, असे म्हटले होते.  मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी या प्रकरणी माफी मागितली होती. दरम्यान, मुखपत्राची जबाबदारी असलेले समन्वयक सुधीर जोशी यांची हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेत असतानापासून सोनिया विरोध हा निरुपम यांच्या डीएनएमध्येच आहे, अशी टीका काँग्रेसच्या एका नेत्याने केली होती. 
या लेखानंतर संजय निरुपम यांच्या विरोधात कारवाईची मागणी जोर धरु लागली होती. काँग्रेस नेते नसीम खान यांनी निरुपम यांना मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरुन पायऊतार करण्याची मागणी केली होती. नसीम खान यांच्या मागणीला काँग्रसेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पाठिंबा दर्शवला होता. यावेळी संजय निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना अध्यक्षपदी आणण्याची मागणी करण्यात आली. मात्र राहुल गांधींनी संजय निरुपम यांना अभय दिल्याने काही नेते नाराज झाले होते. 
 
प्रिया दत्तही नाराज - 
संजय निरुपम यांच्यावर नाराज असलेल्यांमध्ये माजी खासदार प्रिया दत्त यांचाही समावेश आहे. संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर प्रिया दत्तही नाराज असून त्यांनी याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली असल्याची माहिती आहे.  काही महिन्यांपूर्वी तर संजय निरुपम समर्थक अस्लम शेख आणि दत्तसमर्थक नसीम खान यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडादेखील झाला होता. काँग्रेस पक्षाला मुंबईत पुन्हा उभं राहण्यासाठी संजीवनीची गरज असताना पक्षात मात्र एकजूट नसून गट पडलेले दिसत आहे. मुंबई काँग्रेसमध्ये आता देवरा गट, कामत गटापाठोपाठ आता प्रिया दत्त यांचा गट आणि निरुपम गट अशी गटातटात विभागणी झाली आहे. 
 
महापालिकेतील शह - काटशह - 
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून संजय निरुपम यांनी थेट कामत गटाशी पंगा घेत महापालिकेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांना हटवून आपल्या मर्जीतील नगरसेवक प्रवीण छेडा यांची या पदावर नियुक्ती केली होती. गुरुदास कामत गटासाठी हा मोठा हादरा होता. याआधी कामत यांचे खंदे समर्थक अमरजित सिंह मनहास यांना खजिनदारपदावरून हटवून निरुपम यांनी आमदार असल्म शेख यांची नियुक्ती केली.  विरोधी पक्षनेते पदावरून आपल्याला हटवल्याचे आंबेरकर यांना शेवटपर्यंत माहित नव्हते. 
 
ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या -
माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या करताना विश्‍वासात न घेताच परस्पर नियुक्त्या केल्याचा आरोप केला आहे.