Join us  

#KamalaMillsFire: ...तर सर्वांचेच जीव वाचले असते, मनपाचा सर्वच तक्रारींकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 4:49 AM

मुंबई : आगीत भस्मसात झालेल्या मोजोस आणि अबव्ह वन यांसह कमला मिल कम्पाउंडमधील अनधिकृत बांधकामांची तक्रार यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेकडे केली होती.

मुंबई : आगीत भस्मसात झालेल्या मोजोस आणि अबव्ह वन यांसह कमला मिल कम्पाउंडमधील अनधिकृत बांधकामांची तक्रार यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेकडे केली होती. मनसेप्रमाणेच विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी कमला मिलसह मुंबईतील पब, रेस्ट्रॉमधील अग्निशमन यंत्रणा तपासण्याच्या तक्रारी व निवेदने महापालिका व अग्निशमन दलाकडे केल्या होत्या. या तक्रारींची वेळीच दखल घेत महापालिकेने योग्य कारवाई केली असती, तर कदाचित गुरुवारी लागलेली आग आणि त्यात हकनाक मृत्यू पडलेल्या १४ लोकांचे जीव वाचले असते, अशी चर्चा मुंबईकरांमध्ये सुरू आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोअर परेल परिसरात राहणारे कार्यकर्ते मंगेश कशालकर यांनी महापालिकेकडे कमला मिल कम्पाउंडमध्ये अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची रीतसर लेखी तक्रार केली होती. शिवाय या ठिकाणी अग्नी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मात्र कामचुकारपणा करत महापालिकेने खुशालपणे या ठिकाणी अशी कोणतीही बाब आढळली नसल्याचे उत्तर दिले होते. मात्र वेळीच महापालिकेने येथील नियमबाह्य कामांवर बडगा उचलला असता, तर आज परिस्थिती वेगळी असती. कदाचित आग लागलीच नसती, किंवा सक्षम यंत्रणेमुळे तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवता आले असते, अशी प्रतिक्रिया कशालकर यांनी व्यक्त केली.अधिकार फाउंडेशनने मुख्य अग्निशमन अधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे मुंबईतील पब, रेस्ट्रॉ आणि हुक्का पार्लरमधील सुरक्षा यंत्रणांची तपासणी करण्याची मागणी २० नोव्हेंबर २०१७ रोजी केली होती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी फाउंडेशनने तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २६ डिसेंबरला अग्निशमन दलामध्ये विचारपूसही केली. मात्र संबंधित निवेदनच गहाळ झाल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली. त्यामुळे महिन्याभरापूर्वीचे निवेदन गहाळ करण्याऐवजी त्यावर कार्यवाही केली असती, तरी आजची दुर्घटना टाळता आली असती, अशी प्रतिक्रिया फाउंडेशनच्या पदाधिका-यांनी व्यक्त केली आहे.>बाहेर पडतानाही सेल्फीची हौसपबमधील आगीतून बाहेर पडण्याची धडपड सुरू असताना काही अतिउत्साही तरुण-तरुणी मोबाइलवर सेल्फी काढत होते. त्यांच्या या कृत्यामुळे गोंधळ होऊन जखमींना बाहेर काढण्यात अडथळा निर्माण होत होता. त्याचबरोबर एकीकडे भीतीच्या किंचाळ्या सुरू असताना हॉटेलबाहेर असलेले काही जण मदत करण्यापेक्षा आगीचे शूटिंग घेण्यात मग्न होते.

टॅग्स :कमला मिल अग्नितांडवकमलामिल्स