Join us
Daily Top 2Weekly Top 5

कामा, जीटी, सायन, नायर, कूपर, केईएम रुग्णालयांमध्ये दुरवस्थांची रेलचेल

By संतोष आंधळे | Updated: August 16, 2023 11:08 IST

कुठे वॉर्डच आजारी, तर कुठे सीटी स्कॅनची वानवा, रेडिओथेरपी मशिन बंद

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : आंतरराष्ट्रीय शहर, देशाची आर्थिक राजधानी अशा बिरुदावल्या मुंबई महानगराच्या नावाच्या आधी लावल्या जातात. वस्तुत: अशा आंतरराष्ट्रीय म्हणवणाऱ्या शहरातील आरोग्य सुविधा त्याच तोडीच्या असाव्यात, असे संकेत आहेत. मात्र, मुंबईचा कारभार हाकणाऱ्या पालिकेच्या तसेच राज्यशकट चालवणाऱ्या शासनाच्या अशा दोन्ही मिळून पाच रुग्णालयांची दुरवस्था, हे कटू वास्तव आहे. 

केईएम हॉस्पिटलमध्ये सहा वॉर्ड जर्जर अवस्थेत असून त्यातील चार वॉर्डातील रुग्णांना शिवडीतील टीबी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे मेडिसीन विभागाच्या रुग्णांना दररोज तिथे उपचारांसाठी जावे लागते. तर नायर आणि जीटी रुग्णालयांत सीटी स्कॅन मशीनच बंद असल्याने रुग्णांना स्वत:च खिशाला खार लावावा लागत आहे. कामा रुग्णालयात महिला आणि बालकांवर उपचार केले जातात; परंतु, तिथेही सुविधांची वानवाच असून रेडिओथेरपी मशीन बंद असल्याने कर्करुग्णांना टाटा हॉस्पिटल गाठावे लागते.

औषधांच्या चिठ्ठ्या सुरूच

मुंबई महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी कक्षातर्फे महापालिकेतील सर्व रुग्णालयांची औषधांची खरेदी करण्यात येते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्या खात्यातील अधिकाऱ्यांनी वेळेवर खरेदी न केल्यामुळे रुग्णालयाला औषधे वेळेत मिळत नाहीत, त्यामुळे अनेक मूलभूत औषधांचा तुटवडा या रुग्णालयांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषधे घेऊन या, असे सांगतात. 

रुग्ण रुग्णालयात असल्यामुळे नाईलाजास्तव स्वतःचे पैसे खर्च करून, ही औषधे खरेदी करत आहेत, तसेच शासनाच्या अखत्यारीतील जे जे रुग्णालयातही परिस्थिती सारखीच आहे. हाफकिन मंडळातर्फे औषध खरेदीस होणाऱ्या विलंबामुळे रुग्णांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. अनेक वेळा गरीब रुग्णांकडे साधी औषधे घ्यायला पैसे नसतात. त्यामुळे ते समाजसेवा विभागातील अधिकाऱ्यांना भेटून औषधे मिळविण्यासाठी विनवण्या करतानाचे चित्र सध्या सगळ्याच रुग्णालयांत पाहायला मिळत आहे. या रुग्णालयातील चिठ्ठ्या बंद करायच्या असतील, तर औषध खरेदीतील प्रक्रियेत मोठे बदल करावे लागत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

रुग्णालयांची अवस्था...

कूपर रुग्णालय - या रुग्णालयाची सहा माळ्यांची मुख्य इमारत अत्यंत वाईट स्थितीत आहे. रुग्णालयाच्या इमारतीचे डागडुजीचे काम सुरू आहे. सर्वच रुग्ण याच इमारतीत उपचार घेतात, हे विशेष. कूपर रुग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असले तरी एमआरआय आणि सीटी स्कॅन या महत्त्वाच्या चाचणीचे काम  खासगी कंत्राटदाराकडे आहे.

केईएम रुग्णालय - रुग्णालयातील सर्जरी वॉर्डमधील रुग्णांना ईएनटी आणि डोळ्यांच्या वॉर्डचा भाग घेऊन त्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. वॉर्डच्या दुरुस्तीसाठी आणखी सहा महिने लागण्याची शक्यता आहे.

सायन रुग्णालय - अध्यापकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त, त्याचा ताण डॉक्टरांवर येऊन रुग्ण तपासणीसाठी अधिक वेळ लागत आहे. रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेताना अधिक वेळ लागत असल्याचे चित्र आहे. नवीन ओपीडी इमारतीत रुग्णांची भाऊगर्दी असते, त्यामुळे केसपेपर काढण्यावरून रोज भांडणे होतात.

 

टॅग्स :केईएम रुग्णालयमुंबईहॉस्पिटल