Join us  

कालिदास कोळंबकर करणार शिवसेना उमेदवाराचा प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 5:48 AM

काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर शिवसेना-भाजप उमेदवाराच्या प्रचारात उतरणार आहेत.

मुंबई : काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर शिवसेना-भाजप उमेदवाराच्या प्रचारात उतरणार आहेत. स्वत: कोळंबकर यांनी तसे सूचक विधान केले आहे. काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी अद्याप आपल्याशी कोणताही संपर्क केलेला नाही. विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी मात्र संपर्क साधला आहे, अशी माहिती कोळंबकर यांनी सोमवारी दिली.वडाळा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर हे शिवसेना उमेदवाराचा प्रचार करत असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्ष मैदानात न उतरता कोळंबकर यांनी शेवाळे यांच्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केल्याचे बोलले जाते.याबाबत कोळंबकर म्हणाले की, मला अजून बॉसचा आदेश आला नाही. त्यामुळे मी अजून काही ठरवले नाही, असे सूचक दिले. यावर, बॉस म्हणजे कोण, अशी विचारणा केली असता, भविष्यात ज्या पक्षात जाणार आहे, त्या पक्षाचे बॉस, असे त्यांनी स्पष्ट केले. आघाडीचे उमेदवार असलेल्या एकनाथ गायकवाड यांनी अद्याप संपर्क केलेला नाही. युतीचे उमेदवार राहुल शेवाळे मात्र आपल्या संपर्कात आहेत, असेही ते म्हणाले.कोळंबकर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. यापुर्वी कोळंबकर यांनी बी.डी.डी. चाळींच्या पुर्नविकासाच्या मुद्दयावर मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणारे फलक लावले होते. तर, अलीकडेच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात फलकावर मुख्यमंत्र्यांची छबी झळकली होती. त्यामुळे फडणवीसच आता बॉस असल्याचा इशारा कोळंबकरांनी दिला होता. राणे यांनी आता स्वाभिमान पार्टी काढली असली तरी कोळंबकर भाजपत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. भाजप नेत्यांच्या सूचनेनंतर कोळंबकर यांनी शेवाळे यांच्यासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केल्याचे समजते. लवकरच थेट प्रचारातही ते उतरतील, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :कालीदास कोळंबकरमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019शिवसेना