मुंबई : रंगविलेल्या केसांना हात लावल्याच्या रागात तरुणाची हत्या केल्याची घटना शिवाजीनगरमध्ये घडली. हत्येनंतर राज्याबाहेर पळण्याच्या तयारीत असलेल्या के. सय्यद उर्फ शाहरुख खटमल (२३) याला ८ तासांत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.बैगनवाडी येथील रहिवासी असलेला २५ वर्षीय मोहम्मद हुसेन अब्दुल हलीम शेख याची यामध्ये हत्या करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी ४च्या सुमारास सय्यद घराजवळील परिसरात बसला होता. त्याच दरम्यान शेखने मस्करीत त्याच्या रंगविलेल्या केसांवरून हात फिरविला. यामुळे सय्यदने त्याच्याशी वाद घातला. त्याला शिवीगाळ सुरू केली. याच रागात भररस्त्यात त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. या प्रकरणी शेखच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी गुन्हे शाखेचे कक्ष ६ देखील समांतर तपास करत होते. सय्यद हा मोबाइल बंद करून घाटकोपरमार्गे लोकमान्य टिळक टर्मिनसकडे गेल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. तेथूनच तो राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याच्या माहितीमुळे, त्यानुसार गुन्हे शाखेच्या तपास पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.
केसांना हात लावल्याने केली मित्राची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:58 IST