मुंबई : कबड्डीप्रेमींच्या तुफान पसंतीस उतरलेल्या प्रो कबड्डी स्पर्धेचे तिसरे सत्र जानेवारी २०१६मध्ये सुरू होत आहे. जुलै - आॅगस्ट २०१५ दरम्यान झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात बलाढ्य यू मुंबाने विजेतेपद पटकावले. परंतु आता ५ महिन्यांमध्येच स्पर्धेचे तिसरे सत्र कबड्डीप्रेमींच्या समोर येते आहे. यामुळे पुन्हा एकदा कबड्डी चाहत्यांना या रोमांचक खेळाचा थरारक अनुभव घेण्याची संधी मिळेल. असे असले तरी खेळाडूंना मात्र ही स्पर्धा वर्षातून दोनवेळा रुचत नाही.प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या सत्रासाठी यू मुंबा संघ पूर्णपणे सज्ज असून, यानिमित्ताने संघाचा कर्णधार अनुप कुमार याने यू मुंबाच्या तयारीविषयी माहिती दिली. विशेष म्हणजे यंदा पटणा पायरेट्सचा माजी कर्णधार आणि भारतीय संघाचा कर्णधार राकेश कुमार यू मुंबाकडून खेळणार असल्याने संघाची ताकद आणखी वाढली असल्याचेही अनुपने सांगितले. त्याचबरोबर आगामी तिसऱ्या सत्राला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभल्यास कबड्डीसाठी ही बाब निश्चित चांगली असेल आणि यात कबड्डीचाच फायदा आहे, असेही अनुप म्हणाला.वर्षातून दोन वेळा ही लीग खेळवण्याचा विचार वाईट नाही. मात्र माझ्या मते ही स्पर्धा एकदाच खेळवावी. कोणतीही गोष्ट सातत्याने दाखवली गेल्यास चाहत्यांचे आकर्षण कमी होण्याची भीती आहे; शिवाय आज कबड्डीचे चाहते वाढले असून, सर्वांना या स्पर्धेची उत्सुकता लागून राहिलेली आहे, असे अनुपने सांगितले. त्याचवेळी त्याने एक खेळाडू म्हणूनदेखील आपले वैयक्तिक मत मांडताना सांगितले की, जर का या लीगमध्येच आम्ही आमचे ५ - ६ महिने घालवले तर बाकीच्या स्पर्धांना वेळ देणे आमच्यासाठी कठीण होईल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धाही आमच्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या असतात; शिवाय सध्या स्पर्धा वाढली असल्याने दुखापतीदेखील वाढल्या आहेत.स्पर्धेची दोन सत्रे पटणा संघाकडून खेळल्यानंतर राकेश यंदाच्या सत्रापासून ‘मुंबईकर’ झाला आहे. याविषयी त्याने आनंद व्यक्त करताना सांगितले की, नक्कीच यू मुंबा एक बलाढ्य आणि चॅम्पियन संघ आहे. या संघाचा सदस्य झाल्याचा आनंद आहे आणि या संघातून बरेच काही शिकण्यास मिळेल. त्याचप्रमाणे अनुप आणि मी खूप चांगले मित्र असून, आम्ही नेहमी एकत्रित खेळत आलो आहोत. या लीगच्या पहिल्या सत्रात आम्ही वेगळे झालो तेव्हा खूप नाराज झालो होतो. मात्र शेवटी खेळ महत्त्वाचा असतो. परंतु, आता चित्र वेगळे आहे. आम्ही एकत्रित खेळणार असल्याने उत्साह वाढला आहे, असेही राकेश म्हणाला. (क्रीडा प्रतिनिधी)
वर्षातून एकदाच कबड्डी लीग व्हावी
By admin | Updated: December 21, 2015 01:40 IST