Join us
Daily Top 2Weekly Top 5

न्या. रामशास्त्रींच्या न्यायदानाचा अभ्यासपूर्ण वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:08 IST

माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप यांची संदर्भासह अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभलेले ॲड. विलास पाटणे यांचे रामशास्त्री हे पुस्तक ...

माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप यांची संदर्भासह अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभलेले ॲड. विलास पाटणे यांचे रामशास्त्री हे पुस्तक न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या कार्याचा अभ्यासपूर्ण पट उलगडणारे आहे. अत्यंत परिश्रमपूर्वक लेखकाने रामशास्त्रींची निर्भीडता, न्यायनिष्ठुरता, स्पष्टवक्तेपणा, नि:पक्षपातीपणा या गुणांचा वेध घेतला आहे. शब्द प्रकाशनने अतिशय देखण्या स्वरूपात पुस्तक प्रकाशित करून या लिखाणाला न्याय दिला आहे. विक्रम परांजपे या जाणत्या चित्रकाराच्या चिंतनातून साकारलेले आशयघन देखणे मुखपृष्ठ या पुस्तकाच्या वैभवात भर घालते. रामशास्त्रींचे करारी आणि बाणेदार व्यक्तिमत्त्व त्यांच्या कुंचल्यातून प्रभावी साकारले आहे. बालपण, आई-वडिलांचे अकाली निवर्तन, किशोरवयीन जीवन लेखकाने सुरुवातीला मांडले आहे. न्या. रामशास्त्री प्रभुणे यांचा चरित्र ग्रंथ लिहिताना समकालीन इतिहास, संदर्भ सांगणे गरजेचे असल्याने श्री क्षेत्र माहुली, राम प्रभुणे ते न्या. रामशास्त्री प्रभुणे यांचा जीवनप्रवास विषद केला आहे. लेखकाने अनेक संदर्भ पुस्तकांचा आणि पत्रांचा अभ्यास करत हे चरित्र परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. राम ते रामशास्त्री, विधवा विवाह आदी प्रकरणेही महत्त्वाची आहेत.

वाचकांच्या सोयीसाठी काही कठीण शब्दांचे स्पष्टीकरण देणारे परिशिष्ट पुस्तकात जोडले आहे. रामशास्त्रींसंबंधीचा पत्रव्यवहार आणि महत्त्वाची पत्रे अशी दोन स्वतंत्र प्रकरणे या पुस्तकात अंतर्भूत आहेत. शेवटी २२ संदर्भग्रंथ यादी दिली आहे. न्यायव्यवस्थेवरील हे पुस्तक असल्याने शब्दरचनाही अचूक आहे. मथळ्यांत आणि त्यांच्या अंतर्गत मजकुरात किंवा आशयात एकवाक्यता, सुसूत्रता आहे.

- योगेश बिडवई, उपमुख्य उपसंपादक

--------------------

रामशास्त्री

लेखक : ॲड. विलास पाटणे

प्रकाशक : शब्द प्रकाशन

मूल्य : १५० रुपये