सायली कडू ल्ल मुंबईमराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट हीरो जितेंद्र जोशी पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळला आहे. मालिका, चित्रपट, जाहिरातींमध्ये झळकत असतानाही कलाकाराचे रंगभूमीशी नाते कधीच तुटत नाही असे म्हणतात. जितूच्याही बाबतीत तसेच घडले आहे. त्याची पावले आता पुन्हा रंगभूमीकडे वळली असून, तो थेट पत्रकाराच्या भूमिकेत घुसला आहे.जितेंद्र जोशी म्हणजे काही तरी हटके, असे समीकरण पक्के असल्याने आता जितू नक्की काय करणार याची उत्सुकता होतीच. जवळपास ४ वर्षांनी रंगभूमीवर वळत ‘न्यूज स्टोरी’ हे नाटक त्याने स्वीकारले आहे. यात त्याला साथ देत आहे ती अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले. विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने गिरिजाचे मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण होत आहे.ज्येष्ठ साहित्यिक ह.मो. मराठे यांच्या ‘न्यूज स्टोरी’ या कथेचे आता रंगमंचावर नाट्यरूप अवतरणार आहे. या वेगळ्या विषयाच्या नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी नाट्यनिर्माता संतोष काणेकर यांनी उचलली असून, जितूनेही त्यात मोलाचा वाटा उचलला आहे. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन क्षितिज पटवर्धन करत आहे. याविषयी सांगताना जितू म्हणाला, ‘सामान्यपणे आपल्याकडे असा समज आहे की या कलाकाराचा सिनेमा किंवा मालिका चालत नाही म्हणून हा नाटक करतोय. पण प्रत्यक्षात माझ्या बाबतीत तसे नाहीये. मी हे नाटक माझी व्यक्तिश: गरज आहे म्हणून करतोय. नाटकामुळे स्वत:ला परखण्याची संधी मिळते असे मला वाटते.’गेली अनेक वर्षे गुजराती रंगभूमीवर स्थिरस्थावर झालेली गिरिजा मराठी रंगभूमीपासून इतकी वर्षे लांब का होती? याविषयी सांगताना ती म्हणाली, ‘कॉलेजमध्ये असताना एका एकांकिका स्पर्धेदरम्यान मला गुजराती नाटकासाठी विचारण्यात आले. त्या वेळेस थोडे दडपण होते. पण एक चॅलेंज म्हणून स्वीकार करत मी गुजराती रंगभूमीकडे वळले. त्या वेळी महिन्याला २५-३० प्रयोग करताना दुसरे नाटक स्वीकारणे कठीण होते. त्यामुळे मी पाच व्यावसायिक गुजराती नाटके गेली १० वर्षे करत होते. यानंतर लग्न, संसार, मुलगा यातून वेळ काढून नाटक करणे फारसे जमले नाही. क्षितिजचे अफलातून लेखन असलेल्या या नाटकासाठी जितूने विचारले तेव्हा मी नाही म्हणणे शक्यच नव्हते. आपल्या भाषेत काम करण्याची संधी मिळतेय त्यामुळे मी फारच उत्सुक आहे.’मी हे नाटक निवडलं नाहीये. या नाटकाने मला निवडलं आहे. मी यातील पत्रकाराच्या भूमिकेसाठी लायक आहे, असा विश्वास लेखक, दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांना वाटले. जबरदस्त नाटकाचा भाग होण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे.- जितेंद्र जोशी, अभिनेता
जितू झाला पत्रकार!
By admin | Updated: May 29, 2015 00:43 IST