Join us

महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला धक्काबुक्की

By admin | Updated: May 29, 2014 00:57 IST

घरगुती विजेचा व्यावसायिक वापर करणार्‍यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महा वितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला दोघा व्यक्तींनी धक्काबुक्की करून त्यांना धमकाविल्याची घटना खारघर सेक्टर-५ भागात घडली

पनवेल : घरगुती विजेचा व्यावसायिक वापर करणार्‍यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महा वितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला दोघा व्यक्तींनी धक्काबुक्की करून त्यांना धमकाविल्याची घटना खारघर सेक्टर-५ भागात घडली.खारघर पोलिसांनी याप्रकरणी दोघा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खारघर सेक्टर-५ मधील अधिराज इमारतीत महावितरणने घरगुती वापरासाठी वीजपुरवठा केला होता. मात्र या इमारतीत घरगुती विजेचा वापर व्यावसायिक कामासाठी केला जात असल्याची माहिती महावितरणच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यामुळे खारघरमधील महावितरणचे कनिष्ठ अभियंते एस.आय.पाटील हे अधिराज इमारतीत तपासणी करून पुढील कारवाई करण्यासाठी गेले होते. मात्र त्या ठिकाणी असलेल्या रामकरण शर्मा व अमिताभ कुमार या दोघांनी पाटील यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना धक्काबुक्की करून त्यांना बघून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे पाटील यांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रामकरण शर्मा आणि अभिताभ कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महावितरणने याप्रकरणी विजेचा गैरवापर केल्याप्रकरणी २१ लाख ३० हजारांचा दंडही ठोठावला आहे. (वार्ताहर)