Join us

पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामास जूनची डेडलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:16 IST

मध्य रेल्वे प्रशासन : ठाणे स्थानकाच्या जुन्या इमारतीच्या पाडकामास लवकरच सुरुवातलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील ...

मध्य रेल्वे प्रशासन : ठाणे स्थानकाच्या जुन्या इमारतीच्या पाडकामास लवकरच सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील अतिरिक्त वाढणारा भार कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या कळवा-ऐरोली एलिव्हेटेड या रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची गती वाढवून प्रवाशांची गर्दी टाळण्याकरिता तसेच फेऱ्या वाढविण्यास आवश्यक पाचव्या व सहाव्या लाइनचे काम ३० जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले.

रेल्वेच्या विविध समस्यांबाबत प्रशासनास सूचना करण्यास रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या दालनात होणारी खासदारांची बैठक यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. या वेळी महाराष्ट्रातील प्रत्येक खासदाराला त्यांच्या समस्या व सूचना मांडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वैयक्तिक वेळ देणे गरजेचे असल्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल व मध्य रेल्वेचे प्रबंधक शलभ गोयल तसेच एमआरव्हीसीचे चेअरमन रवी खुराना तसेच इतर खासदार उपस्थित होते.

ठाणे रेल्वे स्थानकातील मुंबई दिशेने असणाऱ्या पादचारी पुलाचे काम १० डिसेंबर रोजी व कल्याण दिशेस असणाऱ्या पादचारी पुलाचे काम १५ डिसेंबर रोजी सुरू करण्यात येईल, असे सांगितले. मध्य रेल्वे मार्गावरील १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या, महिला विशेष लोकल, सरकते जिने, नवीन तिकीट खिडकी, शौचालयांची संख्या वाढविण्याची मागणी केली.

१६ एप्रिल १८५३ रोजी ठाणे ते बोरीबंदर अशी भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली होती. त्या ठाणे रेल्वे स्थानकातील धोकादायक झालेली इमारत पाडून नव्या इमारतीसाठी निधीची उपलब्धता केली असून ती पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने लवकरच याचे काम सुरू होईल, असे प्रशासनाने सांगितले.

पूर्व द्रुतगती महामार्गावरील ठाणेजवळील अरुंद रेल्वे पुलावरील नवीन गर्डर टाकण्याचे काम डिसेंबर महिन्यात सुरू होऊन त्यावरील मार्गिकेचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून देऊ. त्याचबरोबर कोपरी सॅटिस २च्या इमारतीच्या आराखड्यास इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ॲथॉरिटीकडून लवकरच मान्यता मिळवून देऊ, असे आश्वासनही दिले.