Join us  

आणखी दोन महिने सुरू राहणार जम्बो कोविड केंद्र; लोकल सुरू होत असल्याने पालिकेची सावध पावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 8:18 AM

एप्रिल-मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर पडू लागला. त्यामुळे पालिकेने सात जम्बो कोविड केंद्रे उभारली.

मुंबई : कोरोनाचा प्रसार मुंबईत आता नियंत्रणात आला आहे. मात्र एकीकडे परदेशातून येणारी विमाने वाढविण्यात आली असून, लोकल सेवाही दहा महिन्यांनंतर सुरू होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सावध पावले उचलत जम्बो कोविड केंद्र ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबईत ५१७ पैकी सध्या सुरू असलेली ३९ कोरोना काळजी केंद्रे यापुढेही सुरू राहणार आहेत.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर रुग्णालयांमधील खाटा अपुऱ्या पडू लागल्या. त्यामुळे पालिकेच्या तीन प्रमुख व उपनगरीय रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात झाली. तसेच खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटाही ताब्यात घेण्यात आल्या. परंतु एप्रिल-मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर पडू लागला. त्यामुळे पालिकेने सात जम्बो कोविड केंद्रे उभारली.

कोरोनाची लक्षणे असलेले, लक्षणविरहित, संशयित अशा रुग्णांसाठी ‘कोरोना काळजी केंद्र - १’,  ‘कोरोना काळजी केंद्र -२’ अशी व्यवस्था करण्यात आली. परंतु, आता कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याने ही केंद्रे बंद करण्याची येत आहेत. त्यानुसार महापालिकेने आतापर्यंत ४७८ केंद्रे आणि महालक्ष्मी रेसकोर्स येथील जम्बो कोविड सेंटर बंद केले. मात्र लोकल सुरू झाल्यास रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावधगिरी म्हणून काही केंद्रे सुरू राहणार आहेत.

३९ केंद्रे सुरू राहणार...लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी (सीसीसी-१) या बफर प्रकारातील दोन दिवसांत सुरू करता येतील अशी २२ केंद्रे आहेत. तर रिझर्व्ह प्रकारात (आठ दिवसांत सुरू करता येतील) अशी २८७ केंद्रे आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी (सीसीसी-२) केंद्रामधून एकूण १८१ पैकी ‘बफर’ प्रकारात २४ आणि रिझर्व्हमध्ये १४४ केंद्रे आहेत. यापैकी ‘सीसीसी-१’मध्ये २७ आणि ‘सीसीसी-२’मध्ये १२ अशी एकूण ३९ कोरोना काळजी केंद्रे सध्या सुरू आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका