Join us

न्यायाधीश वाघेला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

By admin | Updated: February 15, 2016 15:06 IST

न्यायाधीश धीरेंद्र हिरालाल वाघेला यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १५ - न्यायाधीश धीरेंद्र हिरालाल वाघेला यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. दरबार हॉल, राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी समारोहात राज्यपाल  विद्यासागर राव यांनी न्या. वाघेला यांना पदाची शपथ दिली.
राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी न्या. वाघेला यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींनी जारी केलेली अधिसूचना वाचून दाखविल्यानंतर राज्यपालांनी त्यांना पदाची शपथ दिली.
 मुंबई येथे बदलीवर येण्यापूर्वी न्या. वाघेला ओरिसा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर कार्यरत होते. मुंबई उच्च न्यायालचे मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शाह यांचा कार्यकाल ८ सप्टेंबर रोजी संपल्यानंतर न्या. विजया कापसे ताहीलरामाणी या मुख्य न्यायाधीश पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होत्या.   
शपथविधी समारोहाला राज्यपालांच्या पत्नी विनोदा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री दीपक केसरकर, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, महाधिवक्ता श्रीहरी अणे, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. एस आर बन्नूरमठ, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 न्या. वाघेला यांचा जन्म ११ ऑगस्ट १९५४ रोजी राजकोट येथे झाला. त्यांनी राजकोट येथून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर सौराष्ट्र विद्यापीठातून एलएलबी ही पदवी प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. सन १९७६-७७ साली त्यांनी एलएलएम ही पदवी प्राप्त केली. न्या. वाघेला यांनी १९७८ साली वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली व श्रम तसेच औद्योगिक न्यायालयात काम केले. 
 सन १९९९ साली त्यांची गुजरात उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली.  मार्च २०१३ साली त्यांना बढती देण्यात येऊन कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदावर नियुक्त करण्यात आले. दिनांक ४ जून २०१५ रोजी त्यांची ओरिसा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर बदली करण्यात आली.