Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिनी ट्रेनचा प्रवास लांबणार

By admin | Updated: May 9, 2016 03:39 IST

माथेरान-नेरळ मिनी ट्रेनचे डबे वारंवार रूळांवरून घसरत असल्याने प्रशासनाने मिनी ट्रेनला तब्बल २२ ठिकाणी वेगमर्यादा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : माथेरान-नेरळ मिनी ट्रेनचे डबे वारंवार रूळांवरून घसरत असल्याने प्रशासनाने मिनी ट्रेनला तब्बल २२ ठिकाणी वेगमर्यादा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माथेरान ते नेरळ अंतर गाठायला प्रवाशांना आणखी वेळ खर्ची घालावा लागणार आहे. आठवड्याभरात तब्बल दोनवेळा मिनी ट्रेनचा डबा रूळांवरून घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील रेल्वे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता. गेल्या आठवड्यातही अशीच घटना घडली होती. त्या वेळी प्रशासनाने काही ब्रेक पोर्टर कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. मात्र, प्रशासनाने केलेल्या या कारवाईचा विरोध करत कामगारांनी रेल्वेविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनानेही निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रविवारी पुन्हा एकदा रूळांवरून रेल्वेचे चाक घसरल्याने या मार्गावरील अभियांत्रिकी कामे आणि देखभालीबाबतच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे. माथेरान मिनी ट्रेनला एअर ब्रेक लावण्याच्या निर्णयावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मध्य रेल्वे मिनी ट्रेन चालवण्याबाबत फारशी गंभीर नसल्याची टीका होत आहे. दरम्यान, वेगमर्यादेमुळे प्रवास लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)