Join us

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी २४ विभागांचे संयुक्त पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:09 IST

मुंबई - मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते पुन्हा खड्ड्यात गेले आहेत. त्यामुळे गणेश विसर्जनापूर्वी सर्व खड्डे तत्काळ बुजविण्याची मागणी गणेश ...

मुंबई - मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते पुन्हा खड्ड्यात गेले आहेत. त्यामुळे गणेश विसर्जनापूर्वी सर्व खड्डे तत्काळ बुजविण्याची मागणी गणेश भक्तांकडून केली जात आहे. त्यानुसार पालिकेतर्फे सर्व २४ प्रशासकीय विभागनिहाय संयुक्त पथकांची नियुक्त करण्यात आली आहे. विभाग कार्यालये आणि रस्ते विभाग यांचा या पथकांमध्ये समावेश असणार आहे.

३३ हजार १५६ खड्डे बुजवले

९ एप्रिल ते ११ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये रस्त्यांवरील ३३ हजार १५६ खड्डे बुजवले आहेत. त्यासाठी पालिकेच्या वरळीस्थित अस्फाल्ट प्लांट येथे निर्मित केलेले सुमारे २७५० मेट्रिक टन कोल्डमिक्स २४ विभाग कार्यालयात वितरित करण्यात आलेले आहे. त्यातून आतापर्यंत विभाग कार्यालयातील कामगारांमार्फत २४ हजार ३० खड्डे बुजविण्यात आले आहेत. तर, खड्डे बुजविण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत नऊ हजार १२६ खड्डे बुजविण्यात आले आहेत.

रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने काँक्रिटीकरण

डांबराच्या रस्त्यामध्ये असलेल्या बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे ही नित्य प्रक्रिया आहे. त्यामुळे खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.

खड्डे भरण्याच्या कामाला येईल वेग

रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कार्यवाहीमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी पालिकेतर्फे सर्व २४ प्रशासकीय विभागानुसार संयुक्त पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही पथके विभाग कार्यालयासोबत खड्डे बुजविण्याच्या कामासाठी समन्वय साधणार आहेत. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कार्यवाहीला वेग येईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.