Join us  

जोगेश्वरीतील मुलांच्या वसतिगृहाची दुरवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 2:07 AM

जोगेश्वरी पूर्वेकडील मेघवाडी पोलीस ठाण्यासमोरील महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे शासकीय वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे.

मुंबई : जोगेश्वरी पूर्वेकडील मेघवाडी पोलीस ठाण्यासमोरील महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे शासकीय वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये पाण्याची गळती, वीजपुरवठा खंडित, परिसरातील अस्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव इत्यादी समस्यांमुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे असह्य झाले आहे. तसेच वसतिगृहात अंध विद्यार्थी राहत असून त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वसतिगृहाच्या दुरुस्तीबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.पावसाळ्याचे दिवस सुरू असून मोठा पाऊस कोसळल्यावर विद्यार्थ्यांच्या खोल्यामध्ये पाण्याची गळती होते. पाणीगळतीमुळे विद्यार्थ्यांची रात्रीची झोप उडाली आहे. पाण्याची गळती होऊ नये, म्हणून खोल्यांमध्ये ताडपत्री बांधण्यात आली आहे. पाणीगळतीमुळे भिंतींचे पापुद्रे पडत आहेत. वसतिगृहातील अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच वसतिगृहाच्या परिसरातील झाडे एका बाजूला कलंडली असून ती धोकादायक झाली आहेत. बुधवारी रात्रीच्या वेळेस एक झाड कोसळले. मात्र, या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. फेब्रुवारी महिन्यात वसतिगृह दुरुस्तीसाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. अद्याप ८० लाख रुपयांचे काम झालेले नाही. मग हे पैसे गेले कुठे, असा सवाल वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे शासकीय वसतिगृहाचे विद्यार्थी नामदेव गुलदगड यांनी यासंदर्भात सांगितले की, वसतिगृहातील स्वच्छता स्वत: विद्यार्थी करतात. वसतिगृहाच्या टेरेसवर बरीच घाण साचली होती. ती विद्यार्थ्यांनी मिळून साफ केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत गरीब व अंध विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. मात्र, प्रशासन विद्यार्थ्यांना मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवत आहे. आम्ही गृहपाल यांच्याशी संपर्क करून वारंवार वसतिगृहाच्या प्रश्नांबद्दल चर्चा केली आहे. या वेळी गृहपाल यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाशी आपण वारंवार पत्रव्यवहार करीत आहोत. त्याचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रतिसाद देत नाही.>आमच्या खोलीमध्ये प्रचंड प्रमाणात पाणीगळती होते. खोलीमध्ये राहणाºया विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून चार ताडपत्र्या विकत आणून आतून आणि बाहेरून बांधल्या आहेत. याशिवाय पाण्याने एक संगणक संच भिजला आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन वसतिगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.- सागर लोंढे, विद्यार्थी, महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे शासकीय वसतिगृह