Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॉब रॅकेटचा सूत्रधार दिल्लीचा रहिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 05:15 IST

नोकरीच्या शोधात आलेल्या तरुण - तरुणींना १२ हजार पगार आणि १० टक्के कमिशनवर आंतरराष्ट्रीय जॉब रॅकेटच्या सूत्रधाराने साथीदार बनविल्याची माहिती अटक आरोपींच्या चौकशीत समोर आली.

मुंबई : नोकरीच्या शोधात आलेल्या तरुण - तरुणींना १२ हजार पगार आणि १० टक्के कमिशनवर आंतरराष्ट्रीय जॉब रॅकेटच्या सूत्रधाराने साथीदार बनविल्याची माहिती अटक आरोपींच्या चौकशीत समोर आली. मुख्य सूत्रधार हा दिल्लीचा रहिवासी असून, त्याचा शोध सुरू आहे.पोलिसांनी सोमवारी दिल्लीतील जॉब रॅकेटचा पर्दाफाश करून पाच जणांना अटक केली. पंकज रविकुमार हांडा (२७), संजीव ब्रिजमोहन गर्ग (२२), अभिषेक विजेंद्र सिंग (२१), अजकुमार जगदीश प्रसास (२२), सुमन सौरभकुमार मख्खनसिंग (२७) अशी अटक आरोपींची नावे असून, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामागील मुख्य सूत्रधाराने मीडिया टेक नावाने कंपनी स्थापन केली. दिल्लीतच या नावाने कॉल सेंटर सुरू केले. त्यानंतर त्याने नोकरीसाठी जाहिरात दिली. नोकरीची जाहिरात पाहून आलेल्या तरुण-तरुणींना त्याने कामाची रूपरेषा समजावली. १२ हजार रुपये महिना पगार आणि रॅकेटच्या जाळ्यात येणाºया तरुणांकडून येणाºया रकमेमागे १० टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडत नोकरीच्या शोधात आलेले हे तरुण-तरुणी त्याचे साथीदार बनले. सद्य:स्थितीत १३हून अधिक जण त्याच्या कॉल सेंटरमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली.या ठिकाणी काम करणारी मंडळी ही बिहार आणि दिल्लीतील रहिवासी आहेत. फसवणुकीदरम्यान तो दिल्लीतील तरुण-तरुणींना वगळत असे. या रॅकेटमधून यामागील मुख्य सूत्रधाराने कोट्यवधींची कमाई केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. फसवणुकीची रक्कम १६०० रुपयांपासून लाखोंच्या घरात आहे. पण फसवणूक झालेल्यांपैकी कमी पैसे गेल्याने त्यांनी याप्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या तरुण-तरुणींनी विलेपार्ले पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.