Join us
Daily Top 2Weekly Top 5

जे.जे. रुग्णालयात डॉक्टरला मारहाण

By admin | Updated: July 7, 2015 03:02 IST

मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकाने तिथल्या डॉक्टरला शिवीगाळ केली, त्याचा गळा पकडला.

मुंबई : मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकाने तिथल्या डॉक्टरला शिवीगाळ केली, त्याचा गळा पकडला. नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनाही शिवीगाळ केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी जे.जे. रुग्णालयात घडला. यानंतर रुग्णाच्या नातेवाइकाला पोलिसांनी अटक केली. जे.जे. रुग्णालयात सोमवारी नेत्रचिकित्सा विभागात ६७ रुग्ण दाखल झाले. नेत्रचिकित्सा पुरुष वॉर्डमध्ये ४८ खाटा आहेत. जास्त रुग्ण आल्यामुळे काही रुग्णांना थांबण्यास सांगितले होते. ६ रुग्णांना जागा नसल्यामुळे जेवण, औषध देऊन बसण्यास सांगितले होते. यापैकी एकाच्या नातेवाइकाने डॉ. वफी अन्सारी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आम्हाला जागा द्या, काय चालले आहे, असे तो मोठ्या आवाजात बोलू लागला. जेव्हा डॉ. वफीने मी देतो, थोड शांत व्हा, सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नातेवाइकाने त्याचा गळा पकडला. यानंतर नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. रागिणी पारेख वॉर्डमध्ये गेल्यावर त्यांना शिवीगाळ केली. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनाही शिवीगाळ केली. रुग्णाच्या नातेवाइकाने कशा प्रकारे डॉक्टरचा गळा पकडला, शिवीगाळ केली म्हणून त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. नातेवाइकावर भादंवि ३५३, ५०४, ५०६ आणि डॉक्टर संरक्षण कायदा २०१०, कायदा कलम ४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली. अशा प्रकारच्या घटना वारंवार होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)