Join us  

दागिन्यांची निर्यात २५.४७ टक्क्यांनी घटली, उद्योगापुढे आव्हाने; कारागीरही झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 2:57 AM

दागिने आणि ज्वेलरी क्षेत्र निर्यातस्नेही व कामगारकेंद्री समजले जाते. देशाच्या जीडीपीच्या ६ ते ७ टक्के योगदान या क्षेत्राचे आहे. पण आता हे क्षेत्र समस्यांचा सामना करत आहे.

मुंबई : दागिने आणि ज्वेलरी क्षेत्र निर्यातस्नेही व कामगारकेंद्री समजले जाते. देशाच्या जीडीपीच्या ६ ते ७ टक्के योगदान या क्षेत्राचे आहे. पण आता हे क्षेत्र समस्यांचा सामना करत आहे. जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट कौन्सिल (जीजेइपीसी)ने जी माहिती प्रकाशित केली आहे, त्यानुसार, सोन्याच्या दागिन्यांची निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये (एप्रिल ते आॅगस्ट) २५.४७ टक्क्यांनी घटून २.८४ अब्ज डॉलर झाली आहे. गतवर्षी याच काळात ती ३.८२ अब्ज डॉलर एवढी होती.दागिने बनविणाºया कामगारांची संख्या दहा वर्षांपूर्वी ५ लाख होती. ती दोन लाखांवर आली आहे. ही घट ६0 टक्के आहे. जीएसटीचा मोठा परिणाम या क्षेत्रावर झाला असून, दागिने कारागिरांची स्थिती आणखी बिकट होण्याची भीती ज्वेलमेकर वेल्फेअर असोशिएशन (जेएमडब्ल्यूए)चे संस्थापक सदस्य श्री संजय शाह यांनी व्यक्त केली.जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट कौन्सिल (जीजेइपीसी)ने दागिने कारागिरांचे जीवनमान सुधारण्यासाठी निधी उभारणीचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठीचे तीन दिवसांचे ज्वेलरी अँड लाईफस्टाईल प्रदर्शन मुंबईत नुकतेच पार पडले. राज्य सरकारने कामगार कल्याणासाठी ८०० कोटी रुपयांची जी तजवीज केली आहे, त्यातून या कारागिरांच्या प्रशिक्षणासाठी निधी द्यावा आणि वंचित कामगारांना त्यांच्या कलेचे प्रदर्शन घडविण्यासाठी प्रदर्शन स्थळाचे नियोजन करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. काँग्रेसचे नेते माजी खासदार मिलिंद देवरा हेही प्रदर्शनाला हजर होते. त्यांनी कारागिरांचा सत्कारही केली.संघटनेचे निलेश झवेरी म्हणाले की अनेक देशांमध्ये दागिने कारागिरांना प्रतीग्रॅम २००० रुपये मजुरी मिळते. पण भारतात ती केवळ २०० रुपये प्रतीग्रॅम आहे. पण भारतीय दागिने कामगारांचे कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञान व शैली यांबाबत शिक्षण घेण्यातील त्यांची क्षमता यांमध्येही फार मोठे अंतर आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या कमाईवर होतो.

टॅग्स :सोनंजीएसटी