Join us  

Jet Airways Flight : वैमानिकाची चूक की तांत्रिक समस्या ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 1:25 PM

वैमानिकाच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

- खलील गिरकर 

मुंबई -जेट एअरवेजच्यामुंबईहून जयपूरला जाणाऱ्या विमानात कॉकपिट क्रूच्या चुकीमुळे 166 प्रवाशांचे प्राण धोक्यात आले होते. विमान उड्डाण करताना विमानातील हवेचा दाब आवश्यक प्रमाणात ठेवणारी यंत्रणा सुरू न केल्याने विमान उंचावर गेल्यानंतर प्रवाशांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, अशी प्राथमिक माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात ही यंत्रणा सुरू करण्यास विसर झाला की यंत्रणा सुरू असूनही तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. वैमानिकाच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. तर, जेट प्रशासनाने चौकशीनंतर बाबी स्पष्ट होतील, अशी भूमिका घेतली आहे.

साधारणतः कोणतेही विमान उड्डाणासाठी तयार होताना वैमानिकांना चेकलिस्ट तपासावी लागते. त्यामध्ये असणाऱ्या विविध बाबींमध्ये विमानातील हवेचा दाब आवश्यक प्रमाणात ठेवणाऱ्या यंत्रणेचा देखील समावेश असतो. या क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमानिकाकडून अशी चूक होणे अत्यंत अपवादात्मक आहे. किंबहुना हवेचा दाब नियंत्रित ठेवण्यात आल्यानंतर काही तांत्रिक बिघाडामुळे हवेचा दाब अनियंत्रित होण्याची घटना घडली असल्याची शक्यता जास्त आहे.

या विमानात 166 प्रवासी व पाच केबिन क्रू होते. या घटनेतील वैमानिकाची भूमिका व या प्रसंगी कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना कशा प्रकारे सहाय्य केले, त्यांना आवश्यक प्रथमोपचार केले का याची देखील चौकशी करण्यात येणार आहे. विमानातील नियंत्रणाच्या बाबी वैमानिकांच्या ताब्यात असतात. या दोन्ही वैमानिकांच्या कामाची चौकशी करण्यात येत असून चौकशी पूर्ण होईपर्यंत या दोन्ही वैमानिकांना उड्डाणापासून बाजूला करून ग्राऊंड ड्युटीवर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वैमानिकांची चूक आढळल्यास किंवा त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. चौकशी पूर्ण होईपर्यंत या दोन्ही वैमानिकांना उड्डाण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी कोलकाता येथे जाणाऱ्या विमानाच्या कॉकपीटला तडा गेल्याने हवेचा दाब अनियंत्रित झाला होता. त्यावेळी विमानातील प्रवाशांना श्वास घ्यायला त्रास झाला होता. गुरूवारच्या घटनेत, प्रथम विमानातील एसी बंद झाले त्यानंतर हवेचा दाब अनियंत्रित झाला व त्वरित ऑक्सिजन मास्क खाली आले. मात्र, प्रवाशांमध्ये गोंधळ झाला व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. काही प्रवाशांच्या नाकातून व कानातून रक्त येऊ लागल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. मात्र, हवेचा दाब कमी, जास्त होणे ही विमान कंपन्यांची चूक नसून नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असलेली बाब आहे. हवेचा दाब वाढल्यानंतर तत्काळ ऑक्सिजन मास्क सुरू झाले नसते तर ती गंभीर परिस्थिती झाली असती, असे मत या विमानातील एका प्रवाशाने व्यक्त केले. 

 

टॅग्स :जेट एअरवेजमुंबई