Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्री सदस्यांच्या योगदानाने जव्हार हनुमान पॉइंट झाला निसर्गरम्य

By admin | Updated: May 28, 2015 23:02 IST

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वच्छतेबरोबरच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी संपुर्ण राज्यभरात वृक्षलागवड व संवर्धन अभियान देखील सुरू केले.

जव्हार : आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वच्छतेबरोबरच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी संपुर्ण राज्यभरात वृक्षलागवड व संवर्धन अभियान देखील सुरू केले. जव्हार येथील श्रीसदस्यांनी जव्हार शहराच्या सर्व पर्यटनस्थळी स्वखर्चाने वृक्षांची लागवड केली व त्यांच्या संवर्धनासाठी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य दिवसातून दोन वेळा त्यांनी लागवड केलेल्या व पालिकेने लागवड केलेल्या वृक्षांना पाणी घालतात तसेच वृक्षांच्या संरक्षणासाठी श्रीसदस्यांनी नेट लावून झाडांच्या भोवती कुंपण सुद्धा घातले असल्याने हनुमान पॉर्इंट येथील जवळपास ३०० वृक्ष भर उन्हाळ्यात बहरली आहेत. मृत झालेल्या रोपांना पुन्हा नव्याने पालवी फुटल्याने यावर्षी हनुमान पॉर्इंट येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अनेक पटीने वाढली आहे. पालिकेने लागवड केलेले वृक्ष हे सामान्य नागरीकांच्या कराच्या पैशातुन केले आहेत. कारण पालिका कर आकारणी करताना कराच्या १ टक्का रक्कम ही वृक्षकर म्हणून वसुल करीत असते. या वृक्षकरातून वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करावयाची जबाबदारी देखील पालिकेची असते. त्यासाठी माळ्यांची नेमणुक देखील केली आहे. मात्र त्या माळ्यांना इतर कामात जुंपल्यामुळे शहरातील सर्वच पर्यटन स्थळांना ओसाड स्वरूप प्राप्त झाले आहे. ठेकेदार तसेच अनेक दानशुर व्यक्तींनी रोपांच्या संरक्षणासाठी गेल्या १० वर्षात शेकडो ट्री गार्ड देणगी स्वरूपात दिल्या परंतु पाण्याअभावी वृक्षांची वाढच न झाल्याने त्या वेगवेगळ्या ठिकाणी भंगार म्हणून टाकून दिल्या होत्या. पैकी २५ ते ३० ट्री गार्ड श्रीसदस्यांनी गोळा करून त्या पॉर्इंट येथील रोपांना लावल्या. मात्र अजुनही हनुमान पॉर्इंट येथील जवळपास २०० वृक्षांना संरक्षणाची गरज आहे. नागरीकांनी वेळोवेळी पालिकेला त्या बहरलेल्या रोपांना ट्री गार्ड बसविण्याची मागणी पालिकेकडे केली मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावर्षी पालिकेकडे वृक्षकर स्वरूपात जवळपास अडीच लाख रक्कम शिल्लक आहे. परंतु आहे त्या वृक्षांचे संवर्धन करण्याऐवजी येत्या पावसाळ्यात पुन्हा नित्कृष्ट प्रतीचे रोपे लावण्याची परंपरा यावर्षीही कामय राहणार का? असा सवाल नागरीक करीत आहेत. यात मोठ्या अर्थकारणाचा भाग असल्याचे अनेक ज्येष्ठ नागरीकांनी सांगितले. त्यामुळे शिल्लक असलेल्या वृक्षकरातुन ट्री गार्ड खरेदी केल्यास तिनशे वृक्षांना जिवदान मिळून श्रीसदस्यांच्या मेहनतीचे चिज होवू शकते. (वार्ताहर)जव्हार शहर तसेच तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळापैकी एक असलेल्या हनुमान पॉर्इंट (सनराईज पॉर्इंट) या पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ठिकाणी जव्हार नगरपालिकेतर्फे दोन वेळा वृक्षलागवड करण्यात आली. पालिकेने जवळपास दोन वृक्षांची लागवड गेल्या १० वर्षात केली. मात्र त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केल्याने ती झाडे सुकून गेली होती. कारण त्यांना फक्त पावसाळ्यातील पाणीच मिळत होते. इतर ८ महिने त्यांना पाणी न मिळाल्याने ती सुकून चालली होती. तसेच पालिकेने लागवड केलेल्या वृक्षांच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड अथवा तारेचे कुंपण न घातल्याने गुरांनी अनेक झाडे खाऊन उध्वस्त केली होती.नागरीकांच्या करातुन पालिका प्रशासनाने वृक्षांची लागवड जरी केली असली तरी गेली १० वर्षे त्यांच्या संवर्धन व संरक्षणाकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला उजाड स्वरूप आले होते. मात्र आता ८ महिन्यापासुन श्री सदस्यांनी स्वयंस्फुर्तीने त्यांची निगा राखल्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसू लागताच राजकीय पक्ष ही झाडे आम्हीच लावली हे म्हणणे श्रेय लाटण्याचा प्रकार आहे. पालिका प्रशासनाने सर्वच रोपांना ट्री गार्ड बसवून त्यांचे संरक्षण करावे.- एक ज्येष्ठ नागरीक, जव्हारगेल्या वर्षीच महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादुत म्हणून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब धर्माधिकारी यांची शासनाने नियुक्ती केली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे राज्यभरात लाखो अनुयायी असल्याने ते श्री सदस्य वेळोवेळी राज्यभरात तसेच ठरवून दिलेल्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवित असतात.